Join us

'5 दिवसांचा आठवडा करत आहात पण...'; अजित दादांनी काढला चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 3:18 PM

राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ गिफ्ट दिलंय.

मुंबई - महाविकास आघाडी सरकारने 5 दिवसांचा आठवडा हा निर्णय जाहीर केला. त्यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा या निर्णयाला अनुकूलता दर्शवली. मात्र, 5 दिवसांचा आठवडा करत आहात, हरकत नाही. पण, जनतेची कामे झाली पाहिजेत तेही कर्मचाऱ्यांना बघा म्हणावं, असा चिमटा मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवारांना काढला. महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला काहिसा विरोध केला होता. 

राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ गिफ्ट दिलंय. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी 5 दिवसाचा आठवडा करण्याची केलली मागणी महाविकास आघाडी सरकारने मान्य केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, या निर्णयातून अत्यावश्यक सेवांसह विविध महत्त्वाच्या खात्यातील कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलंय. मात्र, या निर्णयावरुन राजी-नाराजी दिसत आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उघडपणे या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तर, अजित पवार यांनीही निर्णयावर बोलताना, चिमटा काढला. 

कामाचा प्रचंड झपाटा असलेले उपमुख्यमंत्री आणि प्रशासनावर वचक असलेले नेते म्हणून अजित पवार यांची ओळख आहे. त्यामुळेच, 5 दिवसांचा आठवडा या निर्णयावर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, कर्मचारी अन् अधिकाऱ्यांना टोला लगावला. अजित पवारांसह काँग्रेस नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनीही या निर्णयास काहीसा विरोध दर्शवला होता. या निर्णयामुळे सरकार दरबारी जनतेची कामे करुन घेण्यात अडचणी येतील, असे त्यांनी म्हटले. मात्र, पाच दिवसांचा आठवडा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी अंमलात आणला होता, याची आठवण महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी करुन दिली. त्यानंतर, राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी एकमताने निर्णय जाहीर केला. 

टॅग्स :अजित पवारउद्धव ठाकरेसरकार