मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी युती तोडण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. राज्यातील जनतेने युतीला जनमत दिले होते. मात्र, शिवसेनेने या जनमताशी बेईमानी केली, असे म्हणत हे सरकार फार काळ टिकणार नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. फडणवीसांच्या या टीकेला अर्थमंत्री जयंत पाटील यांनी हळूवारपणे उत्तर दिलंय.
''देवेंद्र फडणवीस यांना सध्या कोणतेही काम नाही. मला त्यांच्याविषयी पूर्ण सहानुभूती आहे. ताळमेळ नसल्यामुळे सरकार फारकाळ टिकणार नाही, असं त्यांचं म्हणणे आहे. मात्र, असेच थोडे थोडे दिवस करून आम्ही पाच वर्षांचा कार्यकाळ नक्की पूर्ण करू', असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे, विरोधकांना हे तीन पक्षांचं सरकार एकमताने चालणार नसल्याचं वाटत आहे.
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री करू असा शब्द दिला होता. मात्र, हा मुख्यमंत्री शिवसेनेच्या पाठिंब्यावर बनवू, असा शब्द दिला होता का? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला होता. भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पालघरमध्ये झाला. त्यावेळी मुख्यमंत्रिपदावरून झालेला वाद आणि युती तुटण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. तसेच वर्गात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला बाहेर बसवण्यात आलं आहे, अशी खंतही फणडवीस यांनी व्यक्त केली. फडणवीस यांच्या टीकेला महाविकास आघाडीकडून जयंत पाटलांनी संयमी उत्तर दिलंय. थोडे थोडे दिवस करून आम्ही पाच वर्षांचा कार्यकाळ नक्की पूर्ण करू, असा विश्वासच त्यांनी व्यक्त केला.