डोंबिवलीतील फेरीवाला संघटनेची मागणी : महिला फेरीवाल्यांच्या अंगावर जाणा-यांवर अॅट्रॉसीटी गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 07:23 PM2017-11-28T19:23:50+5:302017-11-28T19:32:54+5:30
पश्चिमेला स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिकेने सोमवारी कारवाई केली. त्या कारवाईदरम्यान महापालिकेच्या काही कर्मचा-यांनी महिला फेरीवाल्यांजवळील सामान हिसकावले, त्यांच्या अंगावर धावून गेले. हे योग्य नाही. त्यामुळे अशा कर्मचा-यांवर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हे दाखल करावेत.
डोंबिवली: पश्चिमेला स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिकेने सोमवारी कारवाई केली. त्या कारवाईदरम्यान महापालिकेच्या काही कर्मचा-यांनी महिला फेरीवाल्यांजवळील सामान हिसकावले, त्यांच्या अंगावर धावून गेले. हे योग्य नाही. त्यामुळे अशा कर्मचा-यांवर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी फेरीवाला संघटनेने केली.
या संदर्भात माहिती देतांना कष्टकरी हॉकर्स फेरीवाला युनियनचे सल्लागार प्रशांत सरखोत म्हणाले की, सातत्याने फेरीवाल्यांवर कारवाई होत आहे. त्याबाबत आमचे काहीही म्हणणे नाही, पण ती कारवाई करतांना हातातले सामान हुसकावणे योग्य नाही. त्यात जी महिला पडली, तिला लागले त्याचे काय? असा सवालही करण्यात आला. त्यामुळे संबंधितांवर तातडीने कारवाई करा, अन्यथा आंदोलन करावे लागेल असेही ते म्हणाले. यासर्व बाबींकडे सुरक्षा यंत्रणेने गांभिर्याने लक्ष द्यावे, त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.
नियमानूसार कारवाईला आम्ही कधीही नकार दिलेला नाही, ते आम्ही गेले महिनाभर सहन करतच आहोत. पण अंगावर धावणे, अर्वाच्च बोलणे, उद्धट वर्तन करणे हे पण योग्य नाही. फेरीवालेही माणसेच आहेत त्यांनाही भावना आहेत. हे का बघितले जात नाही. हजारो फेरीवाल्यांच्या रोजीरोटीचा, पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमचेही फेरीवाले स्थानक परिसरात बसत असतील, त्यांच्यावर नियमाने कारवाई करायलाच हवी, पण नाहक त्रास देऊ नये असा इशाराही सरखोत यांनी दिला.