ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 18 - मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घटनेत विवाहित महिलेची तिच्या पतीनेच हत्या केली आहे. तर दुस-या घटनेत एका अनोळखी इसमाच्या डोक्यात दगडाने प्रहार करून त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
बदलापूर पाईप लाईन रोडवरील खोणी गावात राहणाऱ्या रंजना रमेश वाघे या 35 वर्षीय विवाहित महिलेचा तिच्या पतीने धका-बुक्यांनी मारहाण करीत तिला जीवे मारल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. रंजना ही आपल्या पतीसह विटभट्टीवर बिगारीचे काम करीत होती. शुक्रवारी दुपारी अज्ञात कारणावरून त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात रमेश यांनी तिला खूप मारहाण केली त्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरारी रमेशचा शोध घेत आहेत.
तर दुस-या घटनेत निळजे गावातील आदर्श विद्यालयाच्या पाठीमागील रेल्वे पत्रीजवळ एका २५ ते ३० वयोगटाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला आहे. सदर व्यक्तीची ओळख पटली नसून त्याच्या डोक्यात दगडाने प्रहार केला आहे. या प्रकरणीही मानपाडा पोलीस ठाण्यात अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.