डोंबिवलीत मैत्रीला बहर...
By Admin | Published: October 30, 2016 12:27 AM2016-10-30T00:27:15+5:302016-10-30T00:27:15+5:30
दिवाळीच्या पहिल्या दिवशी युवा भक्ती-शक्ती दिन साजरा करण्यासाठी डोंबिवलीच्या फडके रोडवर जमलेल्या तरूणाईने उत्साहाचे दर्शन घडवतानाच जवानांच्या
डोंबिवली : दिवाळीच्या पहिल्या दिवशी युवा भक्ती-शक्ती दिन साजरा करण्यासाठी डोंबिवलीच्या फडके रोडवर जमलेल्या तरूणाईने उत्साहाचे दर्शन घडवतानाच जवानांच्या शौर्यालाही सलाम केला. एकीकडे अध्यात्माचा गजर आणि त्यापाठोपाठ प्रेमाचा बहरही पाहायला मिळाला. शिवाय डोंबिवलीत होणाऱ्या साहित्य संमेलनाबद्दल जागृतीही करण्यात आली.
पहाटे जरी गर्दी नसली तरी सकाळी ९ नंतर प्रचंड गर्दी झाली. तरूणाईसह लहान मुले आणि आबालवृध्दाचीही गर्दी दिसून आली.
गणेश मंदिर संस्थान व भारतीय लोककला अकादमीतर्फे शाहीर अमरशेख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘रंग शाहिरीचे’ कार्यक्रम झाला. शोध नव्या शाहीरांचा या स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त कलाकारांतील सांगलीचे प्रसाद विभूते, विवेक ताम्हनकर, प्रतिक जाधव, वैशाली सावंत, प्रणाली, युवराज, विराज यांचा त्यात समावेश होता. व्यासपीठावर गणेश मंदिर संस्थानचे अच्युत कऱ्हाडकर, प्रविण दुधे, डॉ. उल्हास कोल्हटकर, आगरी युथ फोरमचे गुलाब वझे, प्रभाकर चौधरी, पांडुरंग म्हात्रे, प्रभू कापसे, मसापचे सुरेश देशपांडे आदी उपस्थित होते. हेमलता दीक्षित या लडाख येथे सीमेवर कार्यरत असलेल्या तरूणींचा संस्थानतर्फे सत्कार करण्यात आला.
संमेलनाची जागृती
डोंबिवलीत होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाकडे तरूणाईला वळविण्यासाठी आगरी युथ फोरमतर्फे व्यासपीठावरून आवाहान करण्यात आले. (प्रतिनिधी)
शौर्यस्तंभाचे आकर्षण
साडेसोळा फुटांचा शौर्यस्तंभ हे यंदाचे खास आकर्षण होते. प्रथमेश जोगळेकर, मिलिंद पाचांळ, सिध्देश भोसले, अंजिक्य देव यांनी सैनिकांना आणि तरूणांना शुभेच्छा देण्यासाठी तो साकारला.
चित्रात गर्दी बंदिस्त...
फडके रोडवरील एका बिल्डींगच्या छतावरून शुभम केसूर यांनी तरूणाईने फुललेला फडके रोड चित्रातून रेखाटला. संस्कारभारतीच्या रांगोळ््या, आरंभ, शिवदुर्गा, स्नेहांकित, नंदकुमार जाधव ढोलताशा पथकाची कला यामुळे वातावरण भारून गेले.
किल्ले प्रदर्शन
गणेश मंदिर संस्थान आणि टेक क्षितीजतर्फे मंदिराच्या आवारात कि ल्ले प्रदर्शन भरविण्यात आले. त्यात राजगडाची प्रतिकृती आहे. किल्ले बांधणी स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेत्यांनी राजगड, सिंहगड, कोरीगड, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्गाच्या प्रतिकृती उभारल्या. हे किल्ले प्रदर्शन आठवडाभर खुले आहे. किल्ले बनविण्यासाठी माती, विटा, शहाळी व हिरव्या रांगोळीचा वापर केल्याचे संंस्थेचे महेश मुठे यांनी सांगितले.
थिरकली तरूणाई
शिवसेना आणि युवासेनेतर्फे बाजीप्रभू चौकात विविध गाणी, नृत्ये सादर करण्यात आली. ‘बाई वाड्यावर या’ सारखी गाणी सादर क रून तरूणाईला थिरकायला लावले.
अश्रू अनावर झाले
फडके रस्त्यावर अनेक तरूणांचे विवाह जुळले असल्याने प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांना व्यासपीठावर येण्याचे आवाहान यावेळी करण्यात आले. येथे रांगोळीविक्रेते असलेले जोडपे व्यासपीठावर आले. २० वर्षापूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला होता. पण आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने प्रेमकहाणी सांगताना त्याना अश्रू अनावर झाले. नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी त्यांना भांडवल स्वरूपात लगेचच धनादेश आणि भेटवस्तू दिली.
नाटकाचा प्रयोग : चंद्रलेखाच्या ‘सौजन्याची एैशीतैशी’ नाटकाचा पहिला प्रयोग दिवाळीच्या पहाटे पार पडला. त्यासाठी अमित राज ठाकरे उपस्थित होते. नवयुवक मित्र मंडळातर्फे महारूद्रा व गर्जना ढोल ताशा पथकाच्या गजरात दिवाळी पहाट रंगली.
जपून वाहन चालवा
गाडी चालविताना अपघात टाळण्यासाठी कोणती काळजी घ्याल, याबाबतची जनजागृती संस्कृती वाद्यपथकाद्वारे करण्यात आली. याच पथकातील अभय पाटील यांचा काही दिवसांपूर्वी रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांनी यंदा सुरक्षित वाहनप्रवासाच्या टिप्स दिल्या.
जुगलरंगने मंत्रमुग्ध : कल्याण गायन समाजातर्फे दिवाळी पहाटेनिमित्त संगीत अभ्यासक प्रा. मु. रा. पारसनीस स्मृतिदिनानिमित्त ‘जुगलरंग’ कार्यक्रम पार पाडला. पंडित राम देशपांडे यांचे शिष्य गंधार देशपांडे आणि आदित्य मोडक यांच्या गायनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.