स्वा. सावरकरांना डोंबिवलीकरांची प्रभातफेरी काढून मानवंदना
By अनिकेत घमंडी | Published: February 25, 2024 06:59 PM2024-02-25T18:59:42+5:302024-02-25T19:00:15+5:30
बाजीप्रभू चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, सावरकर रस्ता डोंबिवली पूर्व अशा मार्गाने ही फेरी काढण्यात आली .
डोंबिवली: ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था डोंबिवली शाखा या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावारकर यांच्या ५८ व्या आत्मार्पण दिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रभात फेरी डोंबिवली इंदिरा गांधी चौक ते सावरकर पथ, सावरकर उद्यान पर्यंत काढण्यात आली.
बाजीप्रभू चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, सावरकर रस्ता डोंबिवली पूर्व अशा मार्गाने ही फेरी काढण्यात आली . प्रभात फेरी नंतर पाच मिनिटे आपल्या मनातील सावरकर अंतर्गत त्यांच्या व्यक्तीमत्वावर बोलण्याची अनेकांना संधी देण्यात आली. ह्या प्रभात फेरीला ३०० पेक्षा जास्ती उपस्थिती होती. १२५ शालेय विद्यार्थी, पालक, शिक्षक डोंबिवलीकर नागरिक आणि इतर मान्यवर ह्यांचा सहभाग होता. प्रभात फेरी मध्ये शिवाई बालक मंदिर, विद्यानिकेतन, ओंकार इंटरनॅशनल स्कूल, किड्स कट्टा, लोकमान्य गुरुकुल ह्या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रभात फेरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवक, राष्ट्र सेविका समितीच्या महिलांनी सुद्धा हिरीरीने भाग घेतला होता.
७ संस्थांचे सभासद उत्स्पूर्तपणे सहभागी झाले होते. आपल्या मनातील सावरकर ह्या अंतर्गत माधुरी काकडीकर,बिनेश नायर,अंजली बापट, नीलिमा कोडोलिकर तसेच शाळांमधून किड्स कट्टा शाळेतून अथर्व पाटील, शिवाई बालक शाळेतून हर्षदा मते, दिव्या काळे, आर्या सामंत ओंकार इंटरनॅशनल शाळेतून दिशांत अधिकारी ह्यांनी सादरीकरण केले. स्वांतत्र्यवीर सावरकर ह्यांच्या प्रतिमेचे पूजन आणि सावरकर उद्यान स्थित अखंड सावरकर ज्योतीचे पूजन हे ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे अध्यक्ष मानस पिंगळे आणि स्वातंत्र्यवीरसावरकर सामाजिक संस्था डोंबिवली शाखे चे अध्यक्ष मंगेश राजवाडे ह्यांच्या हस्ते झाले.
छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या प्रतिमेचे पूजन हे जेष्ठ नागरिक सुरेश पुराणिक ह्यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनघा बोंद्रे, कार्यवाह - ब्राह्मण महासंघ, डोंबिवली ह्यांनी केले. ह्या प्रभात फेरीला ब्राह्मण महासंघ, डोंबिवली व स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.