- खलील गिरकर मुंबई : विमान कंपन्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या स्पर्धेमुळे तिकिट दर कमी झाल्याने गतवर्षी देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत १८.६७ टक्के वाढ झाली आहे. डिजिसिए (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय)ने नुकत्याच जाहीर केलेल्या जानेवारी ते डिसेंबर २०१८ या कालावधीच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे.आगाऊ बुकींग केल्यास विमान वाहतूक कंपन्यांकडून अगदी कमी दरात प्रवाशांना तिकिट उलब्ध करून दिले जाते. कमी दरात तिकिट मिळत असल्याने सर्वसामान्यांन नागरिकही आगाऊ बुकींग सेवेचा लाभ घेत विमान प्रवासाचे स्वप्न पूर्ण करीत आहेत. त्यामुळेच गतवर्षी प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. डिजिसिएच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते डिसेंबर २०१८ या कालावधीत १३ कोटी ८९ लाख ७६ हजार जणांनी देशांतर्गत विमान प्रवास केला आहे. २०१७ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत ११ कोटी ७१ लाख ७६ हजार जणांनी प्रवास केला होता. डिसेंबर २०१८ मध्ये १ कोटी २६ लाख ९३ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. २०१७ च्या डिसेंबर महिन्यात हे प्रमाण १ कोटी १२ लाख ४२ हजार इतके होते.>खासगी कंपन्यांना प्राधान्यगेल्या वर्षभरात खासगी विमान कंपन्यांद्वारे १२ कोटी १३ लाख ६४ हजार प्रवाशांनी प्रवास केला, तर एअर इंडिया द्वारे १ कोटी ७६ लाख१२ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. खासगी विमान कंपन्यांचा हिस्सा यामध्ये ८७.३ टक्के तर एअर इंडियाचा हिस्सा १२.७ टक्के आहे. २०१७ च्या तुलनेत एअर इंडियाच्या प्रवाशांच्या संख्येत १३.०३ टक्के वाढ झाली आहे. तर खासगी कंपन्यांच्या प्रवाशांच्या संख्येत १९.४६ टक्के वाढ झाली आहे. गतवर्षी एअर इंडियाद्वारे वर्षभरात १ कोटी ५५ लाख ८१ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. तर खासगी कंपन्यांद्वारे १० कोटी १५ लाख ९४ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. यामध्ये खासगी विमान कंपन्यांचा हिस्सा ८६.७ टक्के तर एअर इंडियाचा हिस्सा १३.३ टक्के होता.>डिसेंबरमध्ये भारमान वाढलेडिसेंबर महिन्यात सर्वात जास्त भारमान स्पाईसजेटचे ९२.७ टक्के होते. त्याखालोखाल इंडिगोचे ८८.९ टक्के, एअर एशियाचे ८८.८ टक्के होते तर एअर इंडियाचे भारमान ८१.२ टक्के होते. नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबरमध्ये विमान कंपन्यांच्या भारमानात वाढ झाल्याचे चित्र आहे. नववर्ष व ख्रिसमस सहित इतर सणांमुळे हवाई प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने भारमानात वाढ झाली आहे. देशांतर्गत विमान कंपन्यांचे विमाने रद्द होण्याचे प्रमाण ०.६६ टक्के राहिले. विमाने रद्द होण्यामध्ये सर्वात जास्त २.४० टक्के एअर इंडियाची विमाने होती, तर विस्ताराचे एकही विमान रद्द झालेले नाही.
देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत १८.६७ टक्क्यांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 5:16 AM