देशांतर्गत विमान प्रवाशांत ३८ टक्क्यांची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:06 AM2021-03-18T04:06:55+5:302021-03-18T04:06:55+5:30
काेराेनाचा फटका लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत ३८ टक्क्यांची घट झाल्याची माहिती ...
काेराेनाचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत ३८ टक्क्यांची घट झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) दिली. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांच्या तुलनात्मक आकडेवारीवरून डीजीसीएने हा निष्कर्ष काढला.
जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये १ कोटी ५५ लाख ६१ हजार प्रवाशांनी प्रवास केला. तर गेल्या वर्षी या काळात तब्बल २ कोटी ५१ लाख ५० हजार जणांनी देशांतर्गत प्रवासासाठी विमान वाहतुकीचा अवलंब केला होता. डीजीसीएनेच्या आकडेवारीनुसार, कोविडपूर्व काळाच्या तुलनेत यंदा विमान प्रवाशांच्या संख्येत ३८.१३ टक्के वार्षिक, तर ३६.७१ टक्के मासिक घट झाली.
जानेवारी २०२१ च्या अखेरीस देशातील कोरोनास्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे फेब्रुवारीत विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याचे या आकडेवारीवरून दिसून येेते. त्याचप्रमाणे या काळात विमान फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण ०.७७ टक्के इतके होते, असे डीजीसीएने नमूद केले.
* दाेन महिन्यांत ४७८ तक्रारी
जानेवारी ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत ४७८ प्रवाशांनी विमान प्रवासाबाबत तक्रारी दाखल केल्या. परताव्याबाबत करण्यात आलेल्या तक्रारींचे प्रमाण यात सर्वाधिक होते. त्याशिवाय विमान उड्डाणास विलंब, बॅगेज, प्रवासी सुविधा, कर्मचाऱ्यांची वर्तणूक, खानपानाची सुविधा याबाबतही तक्रारी प्राप्त झाल्याचे डीजीसीएने सांगितले.
........................