देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या संख्येत २.६२ टक्क्यांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 04:36 AM2019-06-19T04:36:51+5:302019-06-19T04:37:05+5:30
जानेवारी ते मे २०१९ या कालावधीत ५ कोटी ८६ लाख ५४ हजार प्रवाशांनी केला प्रवास
मुंबई : देशांतर्गत प्रवास करणाऱ्या हवाई प्रवाशांच्या संख्येत जानेवारी ते मे २०१९ या कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत २.६२ टक्क्यांची वाढ झाली आहे. ५ कोटी ८६ लाख ५४ हजार प्रवाशांनी या कालावधीत प्रवास केला आहे. गतवर्षी जानेवारी ते मे या कालावधीत ५ कोटी ७१ लाख ५८ हजार प्रवाशांनी हवाई प्रवास केला होता.
मे २०१९ मध्ये एका महिन्यात १ कोटी २२ लाख ७ हजार जणांनी प्रवास केला असून गतवर्षीच्या मे महिन्यात १ कोटी १८ लाख ५६ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)ने जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. गतवर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यातील हवाई प्रवाशांच्या संख्येत २.९६ टक्क्यांची वाढ झाली आहे. मे महिन्यात पर्यटनाचा वाढता ट्रेंड असल्याने हवाई वाहतूक कंपन्यांच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. स्पाइसजेटची प्रवासी संख्या सर्वात जास्त म्हणजे ९३.९ टक्के आहे. मे महिन्यात ती ९३.७ टक्के होती. एअर इंडियाची प्रवासी संख्या मे महिन्यात ८५ टक्के तर एप्रिलमध्ये ८१.२ टक्के होती. गो एअरची प्रवासी संख्या ९३.३ टक्के आहे. गेल्या महिन्यात ती ९०.८ टक्के होती, तर इंडिगोची प्रवासी संख्या ९०.९ टक्के आहे. एप्रिलमध्ये ती ८७.८ टक्के होती. एअर एशियाची प्रवासी संख्या ८७.८ टक्के असून एप्रिल महिन्यात ती ८४.४ टक्के होती. तर विस्ताराची प्रवासी संख्या मेमध्ये ८५.६ टक्के असून एप्रिलमध्ये ती ८४.६ टक्के एवढी होती.