- मनीषा म्हात्रेमुंबई : राष्ट्रीय स्तरावर देदीप्यमान कामगिरी बजावणारे तामिळनाडूचे वेटलिफ्टर पोनराज नाडर सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी खेळायचे म्हणून धडपड करताना दिसत आहे. खांद्यावर सिलिंडर वाहून आपली उपजीविका चालविणारे नाडर यांना लॉकडाऊनच्या कठीण काळात घरगुती गॅस सिलिंडर वाहण्याचे काम पॉवर वेटलिफ्टिंंगसाठीच्या सरावाचे साधन बनले आहे.क्रिकेट आणि इतर खेळांप्रमाणे आॅलिम्पिकसारख्या अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारताने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. असाच आणखीन एक खेळ म्हणजे पॉवर वेटलिफ्टिंंग. याच खेळात स्वत:चे एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी तामिळनाडूच्या एलांथिकुलम या छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या पोनराज व्ही. नाडर यांची धडपड सुरू आहे. सध्या ते मुंबईतील सायन, कोळीवाडा परिसरात राहत असून सिलिंडर वाहण्याचे काम करतात.वडील शेती करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचे. शालेय जीवनात अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावर ते खेळले. यात करिअर करायचे ठरवले. मात्र परिस्थिती आणि घरच्या जबाबदारीने ते शक्य झाले नाही. त्यात तीन भावंडे, पोनराज मोठे असल्याने अकरावीनंतरचे शिक्षण सोडून शेतीत गुंतले. किमान वेटलिफ्टिंंगमध्ये तरी काहीतरी करायचे म्हणून १९९९मध्ये मुंबई गाठली.
मुंबईत सुरुवातीला हमाली करून दिवस काढले. पुढे गॅसवाहक म्हणून कमिशन स्वरूपात नोकरी मिळाली. जेवढे गॅस पोहोचवणार त्यानुसार पैसे मिळत. हेच काम करताना वेटलिफ्टिंंगबाबत आत्मविश्वास वाढला. अनेक खेळाडूंच्या यशाच्या पायºया मनात घर करत गेल्या. सराव सुरू झाला. याच दरम्यान २०१४ मध्ये मुंबईत झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आणि त्यांच्या आत्मविश्वासाला उभारी मिळाली. तेथूनच खुल्या ८३ ते ९० वजनाच्या गटात ते सहभाग घेऊ लागले.मोबाइलवर यशस्वी खेळाडूंचा प्रवास, त्यांचे दिनक्रम, जेवणाबाबत माहिती घेत, स्वत: ते अंमलात आणू लागले. यातून पुढे नाशिकला झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही त्यांनी प्रथम स्थान मिळवले. आतापर्यंत २०हून अधिक खुल्यापॉवर वेटलिफ्टिंंग स्पर्धेत त्यांनी भाग घेतला.यात, स्वत:बरोबर कुटुंबीयांची जबाबदारी, मुलांच्या शिक्षणाचा भारही खांद्यावर कायम आहे. काही मित्रांमुळे जिममध्ये प्रशिक्षण घेतले. तर रेल्वेतील एका मित्राच्या मदतीने लॉकडाऊनपूर्वी परेल येथील रेल्वेच्या जिममध्ये त्यांना प्रशिक्षण घेण्याची मुभा मिळाली. मात्र लॉकडाऊनमुळे सगळेच बंद झाल्याने जिम थांबली. त्यात कामही थांबले. मात्र याच दरम्यान पालिकेकड़ून कंत्राटी पद्धतीने जेवणाची आॅर्डर मित्राला मिळाली आणि त्यांच्याकडे गॅस सेवा पोहोचविल्यामुळे किमान दोन वेळच्या जेवणाचा खर्च भागला. यातही त्यांनी सकाळी दोन तास योगावर भर दिला.- खेळासाठी त्यांना दररोज मांसाहार आणि दुधाचा आहार घेण्यास सांगितले आहे. मात्र, कौटुंबिक परिस्थितीमुळे दररोज हा आहार या खर्चात भागत नाही. मात्र काटकसर करत ते जिद्दीने काम करतात.- वयाच्या चाळीसाव्या वर्षीही भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचे स्वप्न उराशी बाळगून, आलेल्या संकटाशी ते दोन हात करत आहेत. भोईवाडा, परेल भागात ते गॅस सिलिंडर पोहोचविण्याचे काम करत आहेत.