घरमालकाच्या पत्नीचा आंघोळीचा व्हिडीओ बनवणा-या नोकराला अटक! मुंबईतल्या चिंचपोकळी इथल्या टॉवरमधली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 06:42 PM2017-10-18T18:42:39+5:302017-10-18T18:51:16+5:30
घरकाम करणा-या नोकरानेच घरमालकाच्या पत्नीचा आंघोळीचा व्हिडीओ बनवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबई - घरकाम करणा-या नोकरानेच घरमालकाच्या पत्नीचा आंघोळीचा व्हिडीओ बनवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतल्या चिंचपोकळी इथल्या टॉवरमध्ये सोमवारी ही घटना घडली. पोलिसांनी 20 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. मोबाईल कॅमे-याच्या चमकणा-या लेन्समुळे हा संपूर्ण प्रकार महिलेच्या लक्षात आला. बाथरुममधील साबण ठेवायच्या जागी लक्षात येणार नाही अशा पद्धतीने हा मोबाईल ठेवण्यात आला होता.
आंघोळ करणारी व्यक्ती कॅमे-यामध्ये कैद होईल अशा ठिकाणी हा मोबाईल होता. महिलेने आंघोळीला सुरुवात केल्यानंतर साबणाचे भांडे असलेल्या दिशेकडून काहीतरी चमकत असल्यासारखे महिलेला वाटले. तिने साबणाच्या भांडयाची चाचपणी केली असता तिच्या हाताला मोबाईल लागला. त्यावेळी मोबाईल रेकॉर्डींग मोडवर होता. स्वत:च्याच घरात घडत असलेला हा प्रकार पाहून महिलेला धक्का बसला.
हा मोबाईल त्यांच्याच घरात काम करणा-या कैलाश यादवचा असल्याचे समजल्यानंतर तिने पोलीस तक्रार दाखल केली. महिला आंघोळीला जाण्याआधी कैलाश यादवने गपचुप बाथरुममध्ये जाऊन मोबाईल रेकॉर्डींग मोडवर सुरु करुन ठेवला होता. हा सर्व प्रकार सकाळी अकराच्या सुमारास घडला अशी माहिती काळाचौकी पोलीस स्टेशनच्या अधिका-याने दिली.
महिलेच्या पतीचा स्वत:चा व्यवसाय असून, गेल्या दीडवर्षांपासून कैलाश यादव त्यांच्याकडे नोकरी करत होता. पोलिसांनी हा मोबाईल जप्त केला आहे. तक्रारीमध्ये महिलेने मोबाईलमध्ये दोन ते तीन मिनिटांचे रेकॉर्डींग झाल्याची माहिती दिली. कैलाशने कोणाच्या सांगण्यावरुन हा गुन्हा केलेला नाही असे काळचौकी पोलीस स्टेशनचे अधिकारी दिलीप उगळे यांनी सांगितले. कैलाश यादव हा मूळचा बिहारचा असून, तो मागच्या दीडवर्षांपासून या व्यावसायिकाच्या घरी काम करत होता. कैलाश विरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.