Join us

देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत ६३ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विमान प्रवासी संख्येचा आलेख सातत्याने घसरत असल्याने हवाई वाहतूक क्षेत्राची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विमान प्रवासी संख्येचा आलेख सातत्याने घसरत असल्याने हवाई वाहतूक क्षेत्राची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात देशांतर्गत प्रवाशांत ६३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.

मार्च २०२०मध्ये भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर विमान वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले. २५ मे पासून निर्बंध शिथिल केल्यानंतर देशांतर्गत विमान वाहतूक टप्प्याटप्प्याने खुली करण्यात आली. कोरोनाचा धोका कमी झाल्याचे चित्र निर्माण झाल्याने डिसेंबरपासून प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊ लागली. फेब्रुवारी महिन्यात एकूण देशांतर्गत विमान वाहतूक गेल्या वर्षीच्या तुलनेत ६४ टक्के इतकी नोंदविण्यात आली होती; परंतु मार्चपासून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यामुळे पुन्हा प्रवासीसंख्या रोडावली.

हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या आकडेवारीनुसार, मार्च २०२१ मध्ये ७८ लाख २२ हजार देशांतर्गत प्रवासी नोंदविण्यात आले. एप्रिलमध्ये ५७ लाख २५ हजार आणि मे महिन्यात केवळ २१ लाख १५ देशांतर्गत प्रवाशांची नोंद झाली. एप्रिल आणि मे महिन्यातील प्रवासी संख्येची तुलना केल्यास त्यात जवळपास ६४ टक्क्यांची घट तर मार्चच्या तुलनेत ७२ टक्क्यांनी प्रवासी कमी झाल्याचे निदर्शनास येते.

.............

कारण काय?

दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्येत झालेली वाढ यास कारणीभूत असली तरी कोरोना अहवालाच्या सक्तीमुळेही प्रवासीसंख्या कमी झाल्याचे मत निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सर्व मोठ्या विमानतळांनी निगेटिव्ह आरटी-पीसीआर अहवाल सादर करणे बंधनकारक केले. त्याची मुदत आधी ७२ तास आणि नंतर ४८ तासांपर्यंत कमी करण्यात आली. परिणामी अहवाल मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याने प्रवाशांनी विमान प्रवास टाळून अन्य मार्गांचा अवलंब केल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.