मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च-२०२०पासून बंद करण्यात आलेले मुंबई विमानतळावरील टर्मिनल १ हे सुमारे वर्षभरानंतर पुन्हा सुरू होत आहे. देशांतर्गत प्रवासासाठी येथून १० मार्चच्या मध्यरात्रीपासून विमानसेवा सुरू होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी दोन्ही प्रकारची वाहतूक गेले काही महिने टर्मिनल २ वरूनच होत होती. आता १० मार्चच्या मध्यरात्रीपासून गो एअर, स्टार एअर, एअर एशिया आणि ट्रूजेट यांची आंतरदेशीय उड्डाणे टर्मिनल १ वरून सुरू होत आहेत. इंडिगोची बहुतांश उड्डाणे टर्मिनल २ वरूनच होतील. त्यांची काही मर्यादित उड्डाणे टर्मिनल १ वरून होतील. टर्मिनल १ वरून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना आरोग्यविषयक खबरदारी घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या काळात लागू असलेल्या सर्व नियमांचे प्रवाशांना पालन करावे लागेल, असे विमानतळ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.