घरगुती वादातून पत्नीचा खून करुन मुलाच्याही खूनाचा प्रयत्न

By admin | Published: March 23, 2016 08:17 PM2016-03-23T20:17:30+5:302016-03-23T20:22:08+5:30

भाडयाच्या घरात राहण्यापेक्षा स्वत:चे घर घेऊ, या पत्नी विद्याच्या (४५) सततच्या तगाद्याला कंटाळून झालेल्या वादातून सिताराम पेडणेकर (५०) याने बुधवारी सकाळी ८ वा. च्या सुमारास एक्सा ब्लेड

Domestic violence, murder of wife, murder of the child | घरगुती वादातून पत्नीचा खून करुन मुलाच्याही खूनाचा प्रयत्न

घरगुती वादातून पत्नीचा खून करुन मुलाच्याही खूनाचा प्रयत्न

Next

ठाणे : भाडयाच्या घरात राहण्यापेक्षा स्वत:चे घर घेऊ, या पत्नी विद्याच्या (४५) सततच्या तगाद्याला कंटाळून झालेल्या वादातून सिताराम पेडणेकर (५०) याने बुधवारी सकाळी ८ वा. च्या सुमारास एक्सा ब्लेड आणि घरातील चाकूने तिच्या हाताच्या नसा कापून खून केला. मुलगा प्रथमेशला(२२) विषारी द्रव्य प्राशन करायला भाग पाडून त्याच्याही दोन्ही हातांवर वार करुन खूनाचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वत:ही विषारी द्रव्य प्राशन करुन हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना येथील वर्तकनगर इमारत क्रमांक २७ मध्ये घडली. त्याची प्रकृती अत्यवस्थ असून पिता पुत्रांवर ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पेडणेकर कुटूंबिय वास्तव्याला असलेल्या इमारतीचा येत्या काही दिवसांत पुनर्विकास होणार आहे. त्यामुळे त्यांना मे महिन्यात खोली रिकामी करायची होती. आता किती दिवस भाडयाच्या खोलीत रहायचे. विक्रोळीला वडीलोपार्जित घर आहे, तिथेच जाऊ किंवा स्वत:चे घर घेऊ, असा हट्ट विद्याने पतीकडे केला होता. तर विक्रोळीतील घरी रहायला जाण्यास सितारामचा विरोध होता. यातूनच पती पत्नींमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाद धुमसत होता. बुधवारी पहाटेही त्यांच्यातील वाद पराकोटीला गेला. याच वादातून त्याने सुरीने तिच्या दोन्ही हातांच्या नसा कापल्या. त्यानंतर उशिने तिचे तोंड दाबून तिचा खून केला. प्रचंड रक्तास्त्रावामुळे तसेच गुदमरल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यु झाला. त्याच दरम्यान पहाटे ५.३० वा. च्या सुमारास प्रथमेशला वडीलांनी उठविले. त्याचाही त्यांनी गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डास निर्मूलनाच्या आॅल आऊटच्या पाच छोटया बॉटल घेऊन तो आला. त्यातील एका बाटलीतील विषारी द्रव्य मुलाला प्यायला भाग पाडून त्याच्या दोन्ही हातांवर ब्लेडने वार केले. उर्वरित बाटल्यांमधील द्रव्य प्राशन करुन स्वत:च्याही दोन्ही हातांच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रथमेशने विक्रोळी येथे आपले धाकटे चुलते यशवंत यांच्याकडे गेलेल्या दर्शना (१८) ला फोनद्वारे माहिती देण्याचा प्रयत्न केला. फोन न लागल्यामुळे त्याने तिला एसएमएसद्वारे माहिती दिली. ‘आईला वडीलांनी मारुन टाकले आहे, मला भीती वाटते आहे, काही तरी कर’ हा भावाचा एसएमएस वाचून दर्शनाने लागलीच शेजारच्या मीना खिल्लारे यांना ८.४० वाजण्याच्या सुमारास फोन केला. त्यांनी दरवाजा वाजविल्यानंतर प्रथमेशने दरवाजा उघडला. त्यावेळी हा प्रकार उघड झाला. किचनमध्येच रक्ताच्या थारोळयात विद्या निपचित पडली होती. तर तिच्याच जवळ पती सिताराम हाही काहीशा बेशुद्धावस्थेत होता. त्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी धाव घेत विद्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. तर पिता पुत्रांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात खून, खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिताराम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप गोरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. जी. गावित यांच्यासह वागळे इस्टेट विभागाचे पोलीस उपायुक्त व्ही. बी. चंदनशिवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर दर्शना आणि या घटनेतून सुदैवाने बचावलेल्या प्रथमेशकडे पोलिसांनी चौकशीचा प्रयत्न केला. मात्र, प्रकृती अस्वस्थामुळे तो सविस्तर जबाब देऊ शकला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Domestic violence, murder of wife, murder of the child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.