Join us

म्हाडा लॉटरीसाठी हवे २०१८ नंतरचे डोमिसाइल सर्टिफिकिट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 7:20 AM

Mhada : अर्ज नोंदणी करताना इच्छुक अर्जदाराचा मोबाइल नंबर आधारशी लिंक असणे गरजेचे आहे.

मुंबई : म्हाडाच्या घराच्या लॉटरीसाठी अर्ज करताना अर्जदाराने १  जानेवारी २०१८ नंतर जारी केलेले व बारकोड असलेले महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकिट) अपलोड करणे आवश्यक असल्याचे म्हाडाच्या मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके यांनी सांगितले.

अर्ज नोंदणी करताना इच्छुक अर्जदाराचा मोबाइल नंबर आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. नोंदणी करतेवेळी अर्जदाराला डीजी लॉकरमध्ये स्वतःसह पती वा पत्नीचे आधार व पॅनकार्ड अपलोड करून ते लिंक करणे आवश्यक आहे. यामुळे म्हाडाला पडताळणी करताना ही कागदपत्रे उपलब्ध होणार आहेत, असेही बोडके यांनी सांगितले.

मुंबई मंडळाचे उपमुख्य अधिकारी राजेंद्र गायकवाड म्हणाले, अर्ज भरतेवेळी विवाहित अर्जदारांनी विहीत ठिकाणी विवाहित म्हणूनच नमूद करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास विजेत्याला सदनिका नाकारण्यात येऊ शकते. घटस्फोटीत अर्जदारांना सदनिका ताब्यात देतेवेळी डिक्री सादर करावी लागणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील अर्जदारांनी जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. 

पासवर्ड द्यावा लागणारअर्ज करतेवेळी उत्पन्नाचा पुरावा म्हणून आर्थिक वर्ष २०२३-२४ चे आयकर विवरण पत्र सादर करणे गरजेचे असून यावर्षी सोडत प्रणालीत अर्जदाराने त्याचा आयकर खात्याचा पासवर्ड देणे आवश्यक आहे तसेच आयकर खात्याला टू स्टेप व्हेरिफिकेशन लावलेले असेल तर ते अर्ज प्रक्रिया होईपर्यंत काढून टाकावे. अर्जदाराने एकूण उत्पन्न नमूद करताना आयकर विवरण पत्रातील एकूण उत्पन्न रक्कम नमूद करावी लागणार आहे.

कुठेही पक्के घर नसावेप्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत उपलब्ध घरांसाठी अर्ज करण्याकरिता योजनेच्या पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी नसल्यास विजेत्या अर्जदारास सोडत पश्चात नोंदणी म्हाडा करून देणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा कमी असावे तसेच पती-पत्नी यांच्या नावे देशात कुठेही पक्के घर नसावे.

टॅग्स :म्हाडा