मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देऊ केले आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटाने जल्लोष केला असून शिवसेना ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता आहे. त्यातच, शिवसेना दोन गटांत दुभंगल्यामुळे आता पक्षबदल आणि पक्षप्रवेशाच्या जोरदार घडामोडी सुरू आहेत. पक्ष आणि चिन्ह मिळाल्यामुळे शिंदे गटात म्हणजे आत्ताच्या शिवसेना पक्षात प्रवेश घेण्याची स्पर्धाच सुरू आहे. मुंबई आणि ठाण्यात अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. त्यामध्ये, भायखळा येथील डॉन अरुण गवळींच्या भावाचाही समावेश आहे.
एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनीही ज्याचा उल्लेख केला होता, तो मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी याचा भायखळा परिसरात चांगलाच दबदबा आहे. सध्या, अरुण गवळी खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात शिक्षा भोगत आहे. मात्र, अखिल भारतीय सेना नावाने त्यांचा राजकीय पक्ष आहे. मात्र, आता अरुण गवळींचा भाऊ प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी या दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांचाही समावेश होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन या पक्षप्रवेशाचे फोटो शेअर करत माहिती दिली.
मुंबईतील भायखळा परिसरातील माजी नगरसेविका वंदना गवळी आणि प्रदीप गवळी यांच्यासह अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
जिल्ह्यातून, तालुक्यातून पक्षप्रवेश
लोकांना हवी असलेली या भागातले प्रश्न असतील त्यांच्या समस्या असतील त्या सोडवण्याचं काम तुमच्या मार्गदर्शनाखाली तिथे केले जाईल हा विश्वास आपल्याला मी देऊ इच्छितो. गेल्या सहा-सात महिन्यामध्ये बाळासाहेबांच्या विचारांचा सरकार आपण स्थापन केल्यानंतर या राज्यातील अनेक जिल्ह्यातून तालुका तालुक्यातून शहरातून लोकं, कार्यकर्ते विविध पक्षातले पदाधिकारी शिवसेनेमध्ये येत आहेत, असे या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले.