मुंबई : मॅनेजमेंटचे तंत्र शिकण्यास जिथे दोन वर्षे लागतात तिथे ते दहा दिवसात शिकवू, असे कुणी सांगत असेल, तर त्या भूलथापा असून त्यांना बळी पडून आपली फसगत करून घेऊ नका, असा सल्ला ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने (एआयसीटीई) विद्यार्थांना दिला आहे. खासकरून मोटिव्हेशनल (प्रेरणादायी) आणि इन्फ्लुएन्सर (प्रभावशाली) वक्त्यांना ‘एआयसीटीई’ने लक्ष्य केले आहे. भाषणात हे प्रकारचे वक्ते तरूणांना दहा दिवसात व्यवस्थापनाचे तंत्र शिकवण्याचे गाजर दाखवत असतात. परंतु, दहा दिवसात एमबीए किंवा तत्सम व्यवस्थापन शास्त्र विषयातील पदवी देण्याबाबतचे दावे बिनबुडाचे व फसवे असल्याचे एमबीएसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे नियमन करणाऱ्या केंद्रीय नियमन संस्थेने काढलेल्या नोटीसीत म्हटलं आहे.
‘अशा प्रकारचे क्रॅश कोर्स म्हणजे देशातील तरुण मनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एआयसीटीईच्या मान्यतेशिवाय कोणत्याही संस्था किंवा विद्यापीठाला एमबीए किंवा व्यवस्थापनातील इतर तंत्रशिक्षण अभ्यासक्रम (पदविका, पीजी) शिकवण्याची परवानगी नाही,’ असे ‘एआयसीटीई’ने नोटीशीत स्पष्ट केले आहे.
‘एमबीए हा दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी कार्यक्रम आहे. व्यवसाय आणि व्यवस्थापनाच्या विविध क्षेत्रातील प्रगत कौशल्ये आणि ज्ञान प्रदान करण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम केवळ दहा दिवसात पूर्ण होऊ शकत नाही. परंतु, कुठली व्यक्ती अथवा संस्था असा दावा करत असेल, तर तो चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा फसव्या दाव्यांपासून सावध राहावे आणि त्यांना बळी पडून स्वत:ची फसगत करून घेऊ नये, असा इशारा एआयसीटीईने नोटीसीद्वारे दिला आहे.