मुंबईः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यासाठी मोदी सरकारनंही सर्व तयारी पूर्ण केलेली आहे. परंतु भारतात येण्यापूर्वीच ट्रम्प यांनी मोदी सरकारला धक्का दिला आहे. हिंदुस्थान, चीन, दक्षिण कोरियासह अनेक देशांना विकसनशील देशांच्या यादीतून अमेरिकेने बाद केले आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावर कडाडून टीका करण्यात आली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून ट्रम्प यांच्यावर निशाणा साधत मोदींवरही कुरघोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे- विकसित देश म्हणून टाळ्या वाजवाव्यात तर हिंदुस्थानातील 28 टक्के जनता आजही विपन्नावस्थेत जीवन जगते आहे. - शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्वच्छता, दारिद्रय निर्मूलन या सगळ्याच क्षेत्रांत विकसित देशांच्या तुलनेत हिंदुस्थान अजूनही कोसो दूर आहे. विकसित होणे बाकी आहे आणि त्यात आता विकसनशील म्हणून मिळणारे लाभही गेले. - मोदी आणि ट्रम्प यांची घट्ट मैत्री पाहता विकसनशील देशाचा दर्जा काढून घेणारे जे कडू कारले ट्रम्प यांनी पाठवले00 त्याचे नक्कीच साखरपाकात रूपांतर करण्यात आपले पंतप्रधान यशस्वी होतील अशी खात्री बाळगण्यास हरकत नाही!- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या लहरी वागण्या-बोलण्यामुळे कायमच प्रकाशझोतात असतात. त्यांचा लहरीपणा बोलण्यातून नव्हे तर कृतीमधून समोर आला आहे. - दहा दिवसांवर आलेल्या आपल्या हिंदुस्थान दौऱ्याच्या आधी ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या लहरी वर्तनाचा परिचय करून दिला आहे. - इकडे हिंदुस्थानात पायघड्या अंथरून ट्रम्प यांचे जंगी स्वागत करण्याची जय्यत तयारी सुरू असतानाच अमेरिकेने विकसनशील देशांच्या यादीतून हिंदुस्थानचे नाव हटवले आहे. - जागतिक व्यापार संघटनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी समितीने (यूएसटीआर) विकसनशील देशांच्या यादीतून हिंदुस्थानचे नाव वगळले आहे. - हिंदुस्थानसाठी हा मोठाच आर्थिक झटका म्हणावा लागेल. विकसनशील देश या नात्याने हिंदुस्थानला आजवर आपल्या उत्पादनासाठी आणि निर्यातीसाठी अमेरिकन करांमधून मोठी सूट मिळत होती. - मात्र विकसनशील हे बिरूदच आता अमेरिकेने काढून घेतल्यामुळे हिंदुस्थानच्या अमेरिकेतील व्यापाराला जबर झटका बसला आहे. - अमेरिकेच्या करांमधून सबसिडी मिळण्याचे दरवाजेच बंद झाल्याने असंख्य वस्तूंच्या निर्यातीसाठी हिंदुस्थानला आता मोठी रक्कम मोजावी लागेल. - केवळ अमेरिकेपुरतेच नव्हे तर हिंदुस्थानच्या जागतिक व्यापारावरही याचे दुष्परिणाम होणार आहेत. विकसनशील देशांना जागतिक व्यापार संघटनेकडून (WTO) व्यापार वृद्धीसाठी सबसिडी किंवा सवलती दिल्या जातात.
- या सवलती ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपत होत्या. त्यामुळेच कुठल्याही राष्ट्राचा प्रमुख जेव्हा दुसऱ्या देशाच्या भेटीवर जातो तेव्हा काही सकारात्मक गोष्टी करण्याचा एक रिवाज असतो.
- अगदी जुन्या काळातील राजा महाराजांपासून अशा भेटींसाठी मिठायांच्या पेटाऱ्यांसह अनमोल नजराणे पेश केले जात. तोच राजशिष्टाचार आजही वेगळ्या पद्धतीने पाळला जातो.
- तथापि अमेरिकेने या प्रथेलाच सपशेल हरताळ फासला. 24 फेबुवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येत आहेत. ह्युस्टनमधील 'हाऊडी मोदी' च्या धर्तीवर 'केम छो ट्रम्प' हा भव्यदिव्य सोहळा अहमदाबादेत पार पडणार आहे. -दुसऱ्या दिवशी प्रेसिडेंट ट्रम्प राजधानी दिल्लीत दाखल होणार आहेत. ट्रम्प यांच्या हिंदुस्थानातील स्वागत सोहळ्यात कुठलीही कसर राहू नये यासाठी केंद्र सरकार आणि गुजरात सरकार युद्धपातळीवर काम करत आहेत. - दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदी स्वागत सोहळ्याच्या तयारीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ट्रम्प यांच्या या दौऱ्यामुळे हिंदुस्थान आणि अमेरिकेतील मैत्रीचे संबंध अधिक वृद्धिंगत होतील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.- ट्रम्प यांनी मिठाईऐवजी जागतिक व्यापाराच्या क्षेत्रात हिंदुस्थानला झटका देणारा कडू कारल्याचा पेटारा हिंदुस्थानच्या भेटीला धाडला. अमेरिकेत या वर्षाअखेरीस अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे.
- निवडणुका जिंकण्यासाठी अमेरिकींची मने जिंकणे हाच एककलमी कार्यक्रम ट्रम्प यांनी सध्या राबवला आहे. त्यामुळेच अमेरिकन कंपन्यांचे नुकसान टाळण्यासाठी हिंदुस्थानी उद्योजकांचे कंबरडे मोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
- दाओस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेतही ट्रम्प यांनी हिंदुस्थान आणि चीन हे विकसनशील देश असतील तर अमेरिकाही विकसनशीलच देश आहे, अशी भूमिका मांडून जागतिक समुदायाला चकीत केले होते.
- हिंदुस्थानचा जागतिक व्यापार 0.5 टक्क्यांनी वाढला आहे आणि हिंदुस्थान आता 'जी-20' या शक्तिशाली देशांच्या संघटनेचा सदस्य आहे. त्यामुळे हिंदुस्थान आता विकसनशील नव्हे तर विकसित देशांच्या गटात मोडतो.