रक्तदान करा... जीवन वाचवा...
By admin | Published: June 13, 2015 11:25 PM2015-06-13T23:25:00+5:302015-06-13T23:25:00+5:30
रक्त निर्माण करता येत नाही, ते केवळ दान करता येते. जागतिक रक्तदान दिनानिमित्त शहरातील तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून
प्राची सोनवणे, नवी मुंबई
रक्त निर्माण करता येत नाही, ते केवळ दान करता येते. जागतिक रक्तदान दिनानिमित्त शहरातील तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून रक्ताच्या कमतरतेमुळे कोणत्याही व्यक्तीला जीव गमवावा लागणार नाही याची खबरदारी घ्यावी,असे आवाहन रविवारी असलेल्या जागतिक रक्तदाता दिनानिमित्त डी.वाय पाटील रुग्णालयाचे उपवैद्यकीय अधीक्षक श्याम मोरे यांनी केले आहे.
नवी मुंबई शहरात महानगरपालिकेचे वाशी येशील रुग्णालय, जे.व्ही.पी. ब्लड बॅँक, नेरुळमधील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर, तेरणा सह्याद्री हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर अशा एकूण चार रक्तपेढ्या आहेत. मात्र तरीही यंदाच्या उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा जाणवला.
मे महिन्यात रक्तसंकलनाचे प्रमाण यंदा सुमारे ४० टक्क्यांपर्यंत घटले होते. रक्तदाते बाहेरगावी गेल्याने, तरुण रक्तदात्यांचा परीक्षेचा कालावधी, त्याचप्रमाणे यावर्षी प्रचंड उन्हाळ्यामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजनही तुलनेने कमी झाले. त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासला. याशिवाय दरवर्षीपेक्षा यंदा रुग्णालयांकडून रक्ताची मागणी जास्त होती आणि त्या तुलनेने संकलन कमी झाल्याने हा तुटवडा अधिकच जाणवला.
पावसाळा सुरू होताच साथीच्या रोगांची लागण सुरू होते. त्यामुळे रक्ताबरोबरच त्यातील महत्त्वाच्या घटकांची, प्लेटलेट्सची गरज अधिक निर्माण होते. मात्र मे महिन्यातच रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे पावसाळ्यात प्लेटलेट्स आणि रक्ताचा पुरवठा करण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्लेटलेट्स वेळेवर न मिळाल्यामुळे रुग्ण दगावल्याच्याही घटना घडल्या आहेत. मोठ्या रुग्णालयांना दररोज रक्ताच्या सरासरी ५० पिशव्यांची गरज असते. त्यामुळे ज्यांना शक्य आहे अशांनी नियमित रक्तदान करण्याचा सल्ला मोरे यांनी दिला आहे.
रक्तदानाशिवाय कोणतेही मोठे दान नाही. उन्हाळ्यात कमी प्रमाणात झालेल्या रक्तदानामुळे रुग्णालयांना, रक्तपेढ्यांना रक्ताचा तुटवडा भासत आहे. पावसाळ्यातील वाढते आजार लक्षात घेता जास्तीत जास्त संख्येने रक्तदान केले पाहिजे. तरुणांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे.
- श्याम मोरे, उपवैद्यकीय अधीक्षक,
(डी. वाय. पाटील रुग्णालय, नेरुळ)