लस घेण्यापूर्वी करा रक्तदान; नंतर दोन महिने थांबावे लागणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:06 AM2021-03-16T04:06:40+5:302021-03-16T04:06:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. मागील काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा प्रकोप प्रचंड वाढल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. मागील काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा प्रकोप प्रचंड वाढल्याने रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. अशा वेळेस रुग्णालयांना रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासली होती. रक्तपेढीमधील रक्तसाठा कमी पडल्याचे लक्षात येताच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व आरोग्यमंत्र्यांनी रक्तदानाची गरज बोलून दाखविली.
मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. आणि सोबतच लसीकरणालादेखील सुरुवात झाली आहे. लस घेतल्यानंतर त्या व्यक्तीला दोन महिने रक्तदान करता येणार नाही, असे डॉक्टरांच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच दुसरा डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येणार आहे. त्यामुळे येत्या काळात रक्तदात्यांचे प्रमाण घटल्याने रक्ताची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळेस लस घेण्यापूर्वी नागरिकांनी रक्तदान करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
यासाठी लस घेणाऱ्यांनी पुढाकार घेऊन लस घेण्याअगोदर नजीकच्या रक्तपेढीसोबत संपर्क साधून रक्तदान करण्याचे आवाहन डॉक्टरांच्या वतीने करण्यात येत आहे.
अशी आहे आकडेवारी
२५ हजार जणांना दररोज लस दिली जाते.
५ लाख जणांना आतापर्यंत लस देण्यात आली.
जिल्ह्यात एकूण ५८ ब्लड बँक.
दुसऱ्या डोसनंतर २८ दिवसांनी करा रक्तदान
१) कोरोना लसीचे दोन डोस एक महिन्याच्या अंतराने देण्यात येणार आहेत. लसीकरण केल्यानंतर ताबडतोब रक्तदान करणे हे रक्तदात्यासाठी घातक आहे. ते रक्त ज्या व्यक्तीला दिले जाईल त्या व्यक्तीसदेखील याचा परिणाम जाणवू शकतो.
२) मुंबईत कोरोना रुग्ण वाढत असल्याने पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत रुग्णालयांना रक्ताची गरज भासणार आहे. त्यामुळे लसीकरणाआधी नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येणे गरजेचे आहे.
लसीकरणाआधी मी केले रक्तदान; तुम्हीही करा!
यतीन साळवे (रक्तदाता, टिळकनगर) - येत्या काही दिवसातच मी कोरोनाची लस घेणार आहे. परंतु त्याआधी मी रक्तदान केले आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे येत्या काळात मुंबईतील रुग्णालयांना उपचारासाठी रक्ताची मोठी गरज भासणार आहे. यामुळे लस घेण्याआधी नागरिकांनी लसीकरण रक्तदान करायला हवे. तसेच तरुणांनीदेखील रक्तदानासाठी मोठ्या संख्येने पुढाकार घेऊन आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करायला हवा.
- डॉ. अरुण थोरात (सहायक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र)
- सर्व रक्तपेढ्यांना उन्हाळ्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासतो. त्यात आता लसीकरणाने वेग घेतल्यामुळे पुढील दोन महिने अनेक जण रक्तदान करू शकणार नाहीत. रक्ताची गरज भरून काढण्यासाठी लसीकरणाआधी इच्छुक व्यक्तींनी रक्तदान करणे गरजेचे आहे. यासाठी विविध संस्था व मंडळांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणेदेखील महत्त्वाचे आहे.