मुंबई : वादग्रस्त इस्लामी विचारवंत डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फौडेशनला (आयआरएफ) अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याच्याकडून देणग्या मिळत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.‘ईडी’च्या अटकेत डॉ.नाईक यांचा विश्वासू साथीदार आमीर गझदार याच्याकडील चौकशीतून ही माहिती पुढे आली असून त्याबाबत सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, गझदार याच्या पोलीस कोठडीची मुदत २२ फेबु्रवारीपर्यत असून तोपर्यत त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. बेकायदेशीरपणे कोट्यावधींच्या देणग्या मिळविल्याप्रकरणी डॉ.नाईक यांच्या ‘आयआरएफ’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.त्याची राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए) व सक्तवसूली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरु आहे. याप्रकरणी नाईक यांचा विश्वासू साथीदार व त्याच्या अनेक कंपन्यांतील संचालक म्हणून कार्यरत असलेल्या आमीर गझदारला गुरुवारी अटक केली आहे.परदेशातून मिळविलेला बेनामी निधी विविध कंपन्यांच्या नावावर गुंतविण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दाऊद इब्राहिमकडून या संस्थेला मोठ्या प्रमाणात निधीचे वाटप करण्यात आले असून विविध संस्थांच्या माध्यमातून तो ‘आयआरएफ’मध्ये फिरविण्यात आला असल्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. गझदारीकडे केलेल्या चौकशीतून ही माहिती पुढे आली असून हा सर्व व्यवहार तोच करीत असल्याचे म्हणणे आहे. त्याबाबत अधिक तपशील मिळविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
झाकीरच्या संस्थेला दाऊदकडून देणग्या?
By admin | Published: February 21, 2017 4:23 AM