समुद्रात विसर्जित केलेल्या मूर्तींचे ‘दान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 05:21 AM2018-05-24T05:21:49+5:302018-05-24T05:21:49+5:30
विवारी दादर चौपाटी स्वच्छ करताना विसर्जन केलेल्या अनेक मूर्ती छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळून येतात.
मुंबई : ‘बीच प्लीज’ मोहिमेंतर्गत दादर चौपाटी स्वच्छ करण्याचा ध्यास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतला आहे. गेल्या रविवारी या मोहिमेचा ३७वा आठवडा पार पडला. या संपूर्ण कालावधीत आतापर्यंत दादर चौपाटीवरून १४० टन कचरा जमा करण्यात आला आहे. कचरा जमा करताना देव-देवतांच्या मूर्ती छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळतात. या मूर्तींवर संस्कार करून त्या इच्छुक व्यक्तीला किंवा मंदिरांना दान करण्याचा नवा अभिनव उपक्रम मोहिमेंतर्गत सुरू करण्यात आला आहे. ‘मूर्तीदान’ असे या नव्या उपक्रमाचे नाव आहे.
दर रविवारी दादर चौपाटी स्वच्छ करताना विसर्जन केलेल्या अनेक मूर्ती छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळून येतात. घरातील देव-देवतांच्या मूर्ती जुन्या झाल्यावर समुद्रात विसर्जन केल्या जातात. समुद्राच्या प्रवाहाने मूर्ती काठावर येऊन मग सरळ कचऱ्याच्या डब्यात टाकल्या जातात. या सर्व मूर्ती कचरापेटीत जाऊ नयेत, यासाठी ‘मूर्तीदान’ ही मोहीम राबविण्यात आली आहे. किनाºयावर सापडणाºया मूर्तींमध्ये काहींचे अवयव तुटलेल्या अवस्थेत असतात. या मूर्तींची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करून सुस्थितीत दान केल्या जातात.
गणपतीच्या मूर्तींची संख्या अधिक :
आतापर्यंत ३५ मूर्ती सापडल्या आहेत. त्यातील १६ मूर्तींची दुरुस्ती व रंगरंगोटी करून त्या लोकांना दान करण्यात आल्या आहेत. गणपतीच्या मूर्तींची संख्या अधिक होती. तसेच साईबाबा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शंकराची पिंडी, नंदीबैल इत्यादी मूर्तीही आढळल्या आहेत. यातल्या काही मूर्ती दगडांच्या, फायबर, मार्बल आणि लाकडी आहेत. या मूर्तींमुळे समुद्री जिवांना धोका निर्माण होतो. तसेच समुद्रकिनारे अस्वच्छ होतात. त्यामुळे नागरिकांची ही मानसिकता बदलली पाहिजे, असे बीच प्लीज मोहिमेचे संस्थापक मल्हार कळंबे यांनी सांगितले.