Join us

‘डोलो’च्या प्रसारासाठी काेटींची खैरात; ॲड. असीम सरोदे यांचा आरोप: ईडी, सीबीआयने चौकशी करावी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 7:09 AM

कोरोनाकाळात रुग्णाला डोलो ६५० ही गोळी  फायदेशीर असल्याचे भासवून त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी कंपनीने  गोळीच्या प्रसारासाठी डॉक्टर

अलिबाग :

कोरोनाकाळात रुग्णाला डोलो ६५० ही गोळी  फायदेशीर असल्याचे भासवून त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी कंपनीने  गोळीच्या प्रसारासाठी डॉक्टर,  विक्री कर्मचाऱ्यांना एक हजार कोटींच्या भेटवस्तू दिल्या आहेत, याबाबतच्या भ्रष्टाचाराविरोधात  सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.  

ईडी व  सीबीआय यांनी राजकीय पुढाऱ्यांचे भ्रष्टाचार काढताना वैद्यकीय क्षेत्रातील हा भ्रष्टाचार बाहेर  काढावा, अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी शनिवारी येथे केली.

एका न्यायालीन खटल्याच्या कामासंबंधी अलिबागला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनाकाळात ताप आल्यानंतर ‘डोलो ६५०’ ही गोळी दिली जात होती. मात्र, या गोळीच्या प्रचारातून कोट्यवधींची माया कंपनीने गोळा केली असून, साधारण एक हजार कोटींहून अधिक खर्च डॉक्टर आणि वैद्यकीय प्रतिनिधींवर भेटवस्तू देऊन केला गेल्याचे समोर आले आहे. फेडरेशन ऑफ मेडिकल ॲन्ड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियातर्फे या वैद्यकीय प्रतिनिधींच्या  संस्थेने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका  दाखल केली आहे. 

कोविड महामारीच्या काळात ‘डोलो’ हे औषध खूप लोकप्रिय झाले आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला. ज्येष्ठ वकील संजय पारीख यांनी त्याबाबत खंडपीठाला माहिती देताना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अहवालाचाही माहितीचा स्रोत म्हणून उल्लेख  केल्याचे त्यांनी सांगितले.याघटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातही औषधोपचारातही भ्रष्टाचाराची शक्यता वर्तवली जात आहे.

ईडी, सीबीआय या यंत्रणा राजकीय भ्रष्टाचार काढण्यासाठी नव्हे, तर सर्वसामान्य जनतेचा प्रश्न वेठीस धरला जातो अशा ठिकाणचा भ्रष्टाचार काढण्यासाठी आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील  भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी त्यांना सूचना करण्याची मागणी न्यायालयाकडे करणार आहे.- ॲड. असीम सरोदे, विधीज्ञ

डोलो ६५० ही  गोळी तापावर पहिल्यापासून  दिली जात आहे. या गोळीचा प्रचार करण्यासाठी भेटवस्तू दिल्या गेल्याचे यात काही तथ्य नसून अनेक कंपन्यांच्या गोळ्या बाजारात तापावर आहेत. त्यामुळे खास या गोळीचा प्रचार डॉक्टरांकडून करण्यात आलेला नाही. - डॉ. विनायक पाटील, अध्यक्ष, आयएमआय, अलिबाग

टॅग्स :औषधं