Join us

देहदानाचा संकल्प करणाऱ्या मुलाकडून आईचे अवयवदान; तिघांना मिळाले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 1:52 PM

विशेष म्हणजे त्यांचा मुलगा अविनाश साळुंकेंनी मृत्यूपश्चात देहदानाचा अर्ज भरून ठेवला असून आईच्या अवयव दानासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: काळाचौकी येथे अभ्युदय नगरातील ७३ वर्षीय छबूबाई साळुंके यांना गुरुवारी ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर त्यांना तत्काळ परळ येथील ग्लेनगल ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी त्यांना मेंदू मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्याने तीन रुग्णांना जीवदान मिळाले आहे. विशेष म्हणजे त्यांचा मुलगा अविनाश साळुंकेंनी मृत्यूपश्चात देहदानाचा अर्ज भरून ठेवला असून आईच्या अवयव दानासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

हे मुंबई विभागातील ५०वे अवयव दान असून या अवयव दानातून २ किडन्या आणि यकृत दान करण्यात आले आहे. याप्रकरणी साळुंके यांनी सांगितले, ‘ज्यावेळी डॉक्टरांनी आई मेंदू मृत झाल्याची प्राथमिक माहिती दिली, त्याचवेळी माझ्या मनात अवयदानाचा विचार आला होता. अवयवदानाविषयी मला आधीपासूनच माहिती होती. मी आणि माझ्या बायकोने यापूर्वीच देहदानाचा संकल्प अर्ज भरला आहे. 

 जनजागृतीची गरज

  • आईच्या मेंदू मृत जाहीर करण्याच्या अंतिम चाचण्या झाल्यानंतर आम्ही कुटुंबीयांच्या सहमतीने अवयवदान करण्यास संमती दिली.
  • राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. मात्र, त्या तुलनेत मेंदू मृत व्यक्तीचे अवयवदान होत नाही. 
  • जनजागृतीची गरज असून, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
टॅग्स :मुंबईअवयव दानहॉस्पिटल