मुंबई : नोंदणी असलेल्या मात्र मान्यता नसलेल्या छोट्या राजकीय पक्षांवर बुधवारी आयकर विभागाने देशभरात केलेल्या छापेमारीपैकी मुंबईत दोन ठिकाणी छापेमारी झाल्याची माहिती आहे. मुंबईतील या दोन्ही राजकीय पक्षांना गेल्या दोन वर्षांत तब्बल १५० कोटी रुपयांच्या देणग्या प्राप्त झाल्या असून हा पैसा हवाला ऑपरेटरचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी झालेल्या छापेमारीमध्ये प्रामुख्याने अनेक नोंदणीकृत लहान पक्षांवर छापेमारी झाली. मुंबईतील दोन छोटे राजकीय पक्षही आयकर विभागाच्या यादीमध्ये होते. यापैकी एका पक्षाचे कार्यालय सायन-कोळीवाडा येथे आढळून आले तर दुसऱ्या पक्षाचे कार्यालय बोरिवली येथील एका छोट्याशा फ्लॅटमध्ये असल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले. दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांचा जबाब अधिकाऱ्यांनी नोंदविला. गुजरातेतील एका हवाला ऑपरेटरच्या सूचनेवरून आपण राजकीय पक्ष सुरू केल्याचा जबाब या दोन्ही कथित राजकीय पक्षांच्या अध्यक्षांनी दिला. त्यांच्या पक्षाला देणगी स्वरूपात मिळालेला पैसा हा याच ऑपरेटरचा असल्याचे तसेच या व्यवहारांतून त्यांना ०.०१ टक्के ही रक्कम कमिशनपोटी मिळत असल्याचेही सांगितले.
२५० अधिकारी, ३०० गाड्या बुधवारी आयकर विभागाने देशव्यापी छापेमारी केली. यात महाराष्ट्र आणि गुजरात येथे झालेल्या छापेमारीमध्ये आयकर विभागाचे एकूण २५० अधिकारी सहभागी होते. या अधिकाऱ्यांच्या दिमतीला ३०० गाड्यांचा ताफा होता, तर या अधिकाऱ्यांना स्थानिक पोलिसांचे मोठ्या प्रमाणावर संरक्षण होते.
काही पक्ष निव्वळ कागदावरच...देशभरात जी छापेमारी झाली, त्यापैकी काही राजकीय पक्ष निव्वळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे दिसून आले, तर काही ठिकाणी झोपडपट्टीत बंद कार्यालये किंवा एखाद्या व्यक्तीचे घर हेच कार्यालय असल्याचे दिसून आले. तसेच या देशव्यापी कारवाईत या कथित राजकीय पक्षांनी एकूण २ हजार कोटी रुपयांची करचोरी केल्याचा प्राथमिक संशय आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे.