दात्यांनो, लस घेण्यापूर्वी रक्तदान करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:05 AM2021-04-25T04:05:52+5:302021-04-25T04:05:52+5:30
राज्य रक्त संक्रमण परिषदेचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढत आहे. दुसरीकडे सकारात्मक ...
राज्य रक्त संक्रमण परिषदेचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढत आहे. दुसरीकडे सकारात्मक बाब म्हणजे १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे; परंतु कोरोनाची लस घेतल्यानंतर किमान २८ दिवसांपर्यंत म्हणजेच एक महिन्यापर्यंत रक्तदान करता येत नसल्याने राज्य रक्त संक्रमण परिषदेने लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
रुग्णालयांमध्ये कोविड आणि नॉनकोविड अशा दोन्ही रुग्णांवर उपचार केले जात आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रुग्णालयांमधून रक्ताची मागणी वाढली आहे. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांची आवश्यकता भासत आहे. एसबीटीसीचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले की, राज्यात सध्या ४३ हजार युनिट्स इतका पुरेसा रक्तसाठा आहे. मात्र पुढील तीन महिन्यांच्या दृष्टिकोनातून रक्तदात्यांना रक्तदानासाठी आवाहन केले आहे.
एनबीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लसीची मात्रा घेतल्यानंतर पुढील २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येत नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतर रक्तदान करण्याकडे कल कमी झाल्यास राज्यात रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता डॉ. थोरात यांनी व्यक्त केली.
* सद्य:स्थितीत रक्तदान कोण करू शकते?
- रक्तदाता गेल्या २८ दिवसांमध्ये कोणत्याही देशातून आलेला नसावा किंवा त्यांच्या कुटुंबीयातील, सहकाऱ्यांमधील परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तींच्या संपर्कात आलेला नसावा. रक्तदात्यास मागील २८ दिवसांमध्ये खोकला, सर्दी, ताप अशी लक्षणे नसावीत. रक्तदाता हा सुदृढ व निरोगी असावा. रक्तदात्याचे वय १८ पेक्षा जास्त व ६० पेक्षा कमी असावे.
- मधुमेहींना इन्सुलिन असेल, तर त्यांना रक्तदान करता येणार नाही. मधुमेह, रक्तदाबाच्या गोळ्यांद्वारे त्या आजारांवर नियंत्रण असेल, तर ती व्यक्ती रक्तदान करू शकते. मात्र, हृदयविकार, कॅन्सर, इपिलेप्सी, सोरायसिस यांसारखे त्वचेचे आजार असलेल्यांना रक्तदान करता येत नाही. गर्भवती महिला किंवा मूल अंगावर स्तनपान करीत असल्यास, मासिक पाळी सुरू असल्यास रक्तदान करू नये.
* रक्तदानापूर्वी काय काळजी घ्यावी?
पुरुष तीन महिन्यांनी आणि महिला चार महिन्यांनी रक्तदान करू शकतात. रक्तदान उपाशीपोटी करू नये. हलका नास्ता करावा. भरपूर पाणी प्यावे. रक्तदानापूर्वी व नंतर कमीत कमी सहा तास तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारूचे सेवन टाळावे. आरामदायक कपडे परिधान करा. पुरेशी झोप घ्या. रक्तदान करण्यापूर्वी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे द्या. रक्तदानापूर्वी वजन, हिमोग्लोबीन, नाडी, रक्तदाब व इतर महत्त्वाच्या वैद्यकीय तपासण्या डॉक्टरांकडून करण्यात येतात.
............................