- मनोहर कुंभेजकरमुंबई - विलेपार्ले (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेत मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या ठिकाणी लेझर शोला सुरू करण्याची घोषणा केली होती. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महामुंबई मराठा मोर्चा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात डिपीडीसी फंडातून या पुतळ्याच्या परिसरात लाईट आणि साऊंड शो सुरू करण्यात यावा, जेणेकरून हा परिसर एक आंतरराष्ट्रीय केंद्राच्या दर्जाचे होईल, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष,आमदार अँड.आशिष शेलार यांनी केली होती. मात्र लेझर शोमुळे विमानाच्या लँडिंगवर परिणाम होणार आहे. यूएस मध्ये फेडरल एव्हिएशन प्राधिकरणाने विमानतळांभोवती एअरस्पेस झोन स्थापित केले असून जे झोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या लेझरची शक्ती मर्यादित करतात.त्यामुळे येथे लेझर शोला परवानगी देवू नका अशी मागणी वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अँड.गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस आल्मेडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे इमेल द्वारे केली आहे.
तसेच विलेपार्ले (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर आणि टी 2 टर्मिनलजवळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पक्ष्यांची विष्ठा आणि निसर्गाच्या विळख्यापासून संरक्षण करण्यासाठी या दोन्ही पुतळ्यांवर छत्री उभारण्यात यावी,अशी मागणी देखिल त्यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारण्यासाठी यापूर्वी आम्ही अनेकवेळा मागणी करून सुद्धा राज्य सरकारने कोणतीही ठोस पावले अद्याप उचलली नाहीत याबद्धल अँड.गॉडफ्रे पिमेंटा यांनी खंत व्यक्त केली.
विलेपार्ले (पूर्व) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर नियोजित संग्रहालय आजतागायत पूर्णत्वास आलेले नाही याबद्धल त्यांनी खेद व्यक्त केला.या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघ नाख प्रदर्शित करावेत अशी सूचना त्यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या आणि पूजणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या भावनांची राज्य सरकार दखल घेईल अशी अपेक्षा फाउंडेशनचे विश्वस्त ॲड. विवियन डिसोझा व रिटा डिसा सल्लागार यांनी व्यक्त केली.