Shivsena: सहानुभूतीवर मतं मागू नका, कामांच्या मुद्द्यावर मागा; मनसेचं शिवसेनेला चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 10:31 AM2022-10-16T10:31:53+5:302022-10-16T10:32:25+5:30
संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारमधील उद्धव ठाकरेंचं काम आणि मुंबईत महापालिकेत होत असलेल्या भ्रष्ट्राचारावर भाष्य केलं.
मुंबई - शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगल्यानंतर भाजप आणि मनसेकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटावर सातत्याने आरोप आणि टीका केली जाते. मनसचे नेते सोशल मीडियातून शिवसेनेवर बोचरी टीका करत होते. मात्र, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मीडिया किंवा सोशल मीडियावर व्यक्त होऊ नका, असे आदेश दिले आहेत. त्यानंतर, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्यक्त न झालेल्या संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. सहानुभूतीच्या आधारे मत न मागता कामाच्या आधारे मागा, असे चॅलेंजही त्यांनी दिले.
संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारमधील उद्धव ठाकरेंचं काम आणि मुंबईत महापालिकेत होत असलेल्या भ्रष्ट्राचारावर भाष्य केलं. तसेच, केवळ सहानुभूतीच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाऊ नका, कामांच्या आधारे पुढे या. मराठी माणसांनी तुम्हाला सहानुभूती का द्यायची? असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित करत विविध कारणेही मांडली आहेत. तुमचे आमदार फुटले तुम्हाला सहानभूती, तुम्ही मुख्यमंत्रीपद गमावलं तुम्हाला सहानभूती, तुमचं चिन्ह गेलं तुम्हाला सहानभूती, तुम्हाला आणखी कशाकशाची सहानभूती पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला. याबाबत देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना पत्रही लिहिलंय.
आमचे अमित ठाकरे आजारी असताना शिवसेनेने मुंबईतील मनसेचे नगरसेवक चोरले, याची आठवण करुन देत सहानुभूती कशासाठी असा वारंवार सवाल देशपांडे यांनी केला आहे. आम्ही गेली २५ वर्ष रस्त्यात नाही खड्यात चालतोय आम्हाला सहानभूती कधी मिळणार? २५ वर्ष मुंबई ची तुंबई होतेय आम्हाला सहानभूती कधी मिळणार??कशाची सहानभूती पाहिजे तुम्हाला? करोना काळात लपून बसलात त्याची की पन्नास लाखांचं घड्याळ मिळालं त्याची?महापौरांच्या मुलाला करोना काळात कंत्राट दिल त्याची सहानभूती पाहिजे की की लोकांचे करोना मध्ये हाल होत असताना रात्री उशिरापर्यंत पब ना परवानगी दिलीत त्याची सहानभूती पाहिजे? करोना मध्ये जनतेला रुग्णालयात बेड मिळत नव्हता त्याची सहानभूती पाहिजे की सामान्य माणसाला हॉस्पिटल्सनी बिलामध्ये लुटलं त्याची सहानभूती पाहिजे? रेल्वे मध्ये सामान्य माणसाला प्रवेश न देता आठ आठ तास प्रवास करायला लावला त्याची सहानभूती पाहिजे? करोना मध्ये लोकांना उपाशी राहायला लागलं त्याची सहानभूती पाहिजे की शिवभोजन च्या नावाखाली भ्रष्टाचार झाला त्याची सहानभूती पाहिजे?पत्रा चाळीच्या घोटाळ्यात शेकडो मराठी माणसं बेघर केलीत त्याची सहानभूती पाहिजे? बार मालकाकडून शंभर कोटी वसूल केलेत त्याची सहानभूती पाहिजे की वाझेसारख्या अधिकाऱ्याला परत आणलंत त्याची सहानभूती पाहिजे? मा.बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगला हडप केलात त्याची सहानभूती पाहिजे की त्याच्याच बाजूला असलेल्या महाराष्ट्र दालनाची दुरावस्था झाली आहे त्याची सहानभूती पाहिजे?अनधिकृत भोंग्यांविरुद्धय आंदोलन करण्याऱ्या महाराष्ट्र सैनिकांना तडीपार केलंत जेल मध्ये टाकलेत त्याची सहानभूती हवीय? असे अनेक सवाल देशपांडे यांनी पत्रातून विचारले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर बोलण्यास देशपांडे यांनी नकार दिला. तसेच, राज ठाकरे मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडतील का, या प्रश्नावरही ते सध्या महापालिका निवडणुका होत आहेत, त्यावर मी बोलेन. विधानसभा आल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर देईन, असे त्यांनी म्हटले.