‘घाबरू नका, कर्तव्य पार पाडा’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 01:32 AM2020-04-29T01:32:18+5:302020-04-29T01:32:34+5:30
सोमय्या महाविद्यालयातील विलगीकरण कक्षाची पाहणी करून सोयी-सुविधांचा आढावा घेतला.
मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी रुग्णालयांना भेटी देण्याचा दिनक्रम कायम ठेवून मंगळवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सायन रुग्णालयाला भेट देऊन कोरोना रुग्णांची सुश्रुषा करणाऱ्या परिचारिकांशी संवाद साधला. तसेच सोमय्या महाविद्यालयातील विलगीकरण कक्षाची पाहणी करून सोयी-सुविधांचा आढावा घेतला.
कोरोना रुग्णांची सेवा करणे हे आपले कर्तव्य असून यापासून घाबरून न जाता ही आपल्या आयुष्यातील पहिली संधी आहे. या युद्धजन्य परिस्थितीत आम्ही तत्पर असल्याचे आपल्याला दाखवून द्यायचे असल्याचे महापौरांनी यावेळी परिचारिकांना सांगितले.
>सोमय्या विलगीकरण कक्षाची महापौरांनी केली पाहणी
महापौरांनी सोमय्या महाविद्यालयात नव्याने तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी केली. या महाविद्यालयातील सहा खोल्यांमध्ये ५५ खाटांची अद्ययावत व्यवस्था करण्यात आली असून येथे पुरुष, महिला व लहान मुलांसाठी बेड आरक्षित ठेवण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले. महापालिका जरी कोरोना रुग्णांसाठी अद्ययावत
व्यवस्था करीत असली तरी नागरिकांनी घरीच राहावे, सुरक्षित राहावे व इतरांनाही सुरक्षित ठेवावे, असे आवाहन महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी सर्व मुंबईकर नागरिकांना केले आहे.