पांढऱ्या बुरशीला घाबरू नका - वैद्यकीय तज्ज्ञांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:05 AM2021-05-24T04:05:52+5:302021-05-24T04:05:52+5:30

मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनानंतर म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीच्या आजाराची दहशत निर्माण झाली आहे. याचा धोका टळत नाही, तोवर ...

Don't be afraid of white fungus - medical experts say | पांढऱ्या बुरशीला घाबरू नका - वैद्यकीय तज्ज्ञांची माहिती

पांढऱ्या बुरशीला घाबरू नका - वैद्यकीय तज्ज्ञांची माहिती

Next

मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनानंतर म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीच्या आजाराची दहशत निर्माण झाली आहे. याचा धोका टळत नाही, तोवर व्हाईट फंगस म्हणजे पांढऱ्या बुरशीचा त्रास असलेल्या रुग्णांविषयी माहिती समोर आली आहे. मात्र या पांढऱ्या बुरशीच्या आजाराला घाबरून जाण्याची गरज नसल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे.

काळ्या बुरशीनंतर आता पांढऱ्या बुरशीची समस्या आढळल्याने सामान्यांच्या मनात घबराट पसरली आहे. याविषयी, वाॅकहार्ट रुग्णालयाचे औषध विभागाचे प्रमुख डॉ. बेहराम पार्डीवाला यांनी सांगितले की, कोविडपूर्वीपासून पांढऱ्या बुरशीचा आजार अस्तित्वात आहे. पांढऱ्या बुरशीचा संसर्ग फुफ्फुसापर्यंत झाल्यास तो धोकादायक ठरू शकतो. तसेच मधुमेह असणाऱ्या रुग्णांमध्ये स्टेरॉईडच्या अतिवापरामुळे शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती कमी झाल्याचे या संसर्गात दिसून येते. नख, त्वचा, पोट, मूत्रपिंड, मेंदू आणि तोंडाच्या आत याचा संसर्ग होऊ शकतो. या समस्यांचे लवकर निदान झाल्यास उपचारांती यावर नियंत्रण मिळविणे शक्य होते, त्यामुळे घाबरून न जाता प्राथमिक लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

तर डॉ. कृष्णा जैन यांनी सांगितले की, कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना हा संसर्ग होतो. जर रुग्ण पाणी किंवा इतर गोष्टींच्या संपर्कात आल्यास व त्याची स्वच्छता न झाल्यास हा संसर्ग होतो. या आजारात रुग्णांमध्ये कोविडसारखी लक्षणे दिसतात पण त्यांची चाचणी नकारात्मक येते. सीटी स्कॅन किंवा क्ष-किरणांनी त्याची तपासणी करतात.

बिहारमध्ये आढळले रुग्ण

पांढऱ्या बुरशीचे रुग्ण बिहारमधील पाटणा येथे आढळले आहेत. काही दिवसांपूर्वी पाटण्यामध्ये ४ रुग्ण आढळले होते. दरम्यान, एक दिलासा देणारी बाब म्हणजे ॲंटी फंगल औषध दिल्यानंतर हे चारही रुग्ण आता बरे झाले आहेत. मात्र, डॉक्टरांनी सांगितले की, फुफ्फुसालाही पांढऱ्या बुरशीची लागण होते.

Web Title: Don't be afraid of white fungus - medical experts say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.