मुंबई- मनसेप्रमुखराज ठाकरे यांचा स्थगित झालेला अयोध्या दौरा आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना दिलेला इशारा यावरून सुरू असलेला राजकीय कलगीतुरा अद्याप थंड होण्याचं नाव घेत नाही. मनसेकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचा एक फोटो शेअर करण्यात आला. त्यानंतर मनसे आणि राष्ट्रवादीत ट्विटरवॉर सुरु आहे.
मनसेने शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचा एक फोटो शेअर केल्यानंतर राष्ट्रवादीकडूनही शरद पवार आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा फोटो पोस्ट केला. तसेच राज ठाकरे आणि शरद पवारांचा फोटोही राष्ट्रवादीचे नेत अमोल मिटकरी यांनी ट्विटरवर शेअर करत काही फोटो चांगले असल्याचं म्हटलं.
मनसे आणि राष्ट्रवादीत जुंपली असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलेलं ट्विट चांगलचं चर्चेत आलं आहे. राज ठाकरे राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय, हे कसं कळत नसेल?, असं रोहित पवार म्हणाले. तसेच बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं, असं म्हणत आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
रोहित पवार पुढे म्हणाले की, राहिला प्रश्न शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांच्या एकत्रित फोटोचा.... तर शरद पवार हे अनेक वर्षे 'महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे'चे अध्यक्ष आहेत आणि बृजभूषण सिंह हे 'भारतीय कुस्ती संघा'चे अध्यक्ष आहेत. मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळं संभाव्य अपघात टळून स्वतःच्याच पक्षाचा बचाव तरी करता येईल, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.
दरम्यान, आत्ता जे उत्तर प्रदेश, बिहारचं बोलतायत, आंदोलन होऊन १२-१४ वर्ष झाली. तुम्हाला आता जाग आली का?, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरेंनी भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांना विचारला. अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला. त्यामुळे अयोध्या दौरा रद्द केल्याची माहिती राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत दिली होती.