शिवसेना-भाजप एकत्र आल्यास नवल वाटायला नको, भाजपच्या माजी मंत्र्याचं मोठ विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 04:52 PM2021-06-22T16:52:20+5:302021-06-22T16:53:35+5:30
वर्धापन दिनाच्या भाषणातील मुख्यमंत्र्यांनी केलेली राजकीय फटकेबाजी आणि सरनाईकांनी भाजपशी जुळवून घेण्याची केलेली विनवणी यामुळे महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे
मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रामुळे रविवारी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या दुसऱ्या दिवशीचे हे पत्र दहा दिवसानंतर आणि शिवसेना वर्धापन दिनाच्या दुसऱ्या दिवशी माध्यमात आले. त्यानंतर, राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. भाजपा-शिवसेना एकत्र येणार, अशीही चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही, या वृत्ताला एकप्रकारे दुजोराच दिला आहे.
वर्धापन दिनाच्या भाषणातील मुख्यमंत्र्यांनी केलेली राजकीय फटकेबाजी आणि सरनाईकांनी भाजपशी जुळवून घेण्याची केलेली विनवणी यामुळे महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पत्रामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाच्या चर्चांनी उचल खाल्ली आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रताप सरनाईकच नाही, तर शिवसेनेचे 90 टक्के आमदार, खासदार सरकारवर नाराज आहेत, असे म्हटले. तसेच, सरकारमध्ये फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचीच कामं होत आहेत. काँग्रेस–राष्ट्रवादी आपला पक्ष मजबूत करतायत, शिवसेना कमजोर होत आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार आणि आमदार या सरकारवर नाराज आहेत. वीज कापल्याने शिवसेना आमदारांवर लोकांचा रोष कायम आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र आले तर नवल वाटायला नको, असा गौप्यस्फोटही बावनकुळे यांनी केला आहे.
भाजपसोबत जुळवून घेण्याचा विनंतीपूर्वक सल्ला
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक शनिवारी (19 जून) माध्यमांसमोर आले. सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून त्यात आपलं मत मांडलं आहे. यामध्ये त्यांनी भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिलाय.