Join us

भाडोत्रीला त्रास देऊ नका, सांगणे मालकाच्या जीवावर बेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:06 AM

स्थानिक टवाळखोराकडून हत्या, दोघांना अटकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाडोत्रीला त्रास देऊ नका, सांगणे मालकाच्या जीवावर बेतल्याची घटना ...

स्थानिक टवाळखोराकडून हत्या, दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भाडोत्रीला त्रास देऊ नका, सांगणे मालकाच्या जीवावर बेतल्याची घटना मुलुंडमध्ये घडली. राकेश वर्मा असे मृत मालकाचे नाव असून, स्थानिक टवाळखोरांनी दिवसाढवळ्या चाकू भोसकून त्याची हत्या केली. या प्रकरणी सनी देठेसह दोघांना मुलुंड पोलिसांनी अटक केली, तर उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

मुलुंड पश्चिमेकडील एस.एन. रोड परिसरात राकेश वर्मा कुटुबीयांसोबत राहतात. त्यांचे अलीबहादूर चाळीत असलेले दुकान रेहमान शेख यांना भाड्याने दिले आहे. शेख यांचा बिर्याणी विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या काही दिवसांपासून याच परिसरात राहणारा सनी देठे आणि त्याचे मित्र बिर्याणी खाऊन त्याचे पैसे देत नव्हते. रेहमानने याबाबत वर्मा यांना सांगितले. त्यानुसार, वर्मा यांनी सनीला त्याला त्रास देऊ नये, यासाठी विनंती केली. त्यानंतर, रविवारी दुपारी रेहमान घरी आला व त्याने सनी आता त्रास देत नसल्याबाबत सांगितले. मात्र, दुपारी सव्वातीनच्या सुमारास सनी घरी धडकला. त्याने वर्मा यांना घराबाहेर बोलावले आणि ते बाहेर येताच, त्यांना ओढून जवळील मैदानात नेत मारहाण सुरू केली.

मारहाणीबाबत समजताच, त्यांच्या पत्नीने त्या ठिकाणी धाव घेतली, तेव्हा सनीने त्यांनाही मारण्याची धमकी दिली आणि वर्मा यांच्या पोटात चाकू भोसकून त्यांची हत्या केली. पत्नीने आरडाआरेडा केल्याने नागरिकांची गर्दी जमा झाली. तेव्हा सनी आणि त्याच्या साथीदारांंनी पळ काढला. पत्नी खुशबू (३६) हिच्या तक्रारीवरून वरील घटनाक्रम समोर आला. त्यानुसार, पोलिसांनी सनी देठे आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.

* फरार साथीदारांचा शाेध सुरू

आरोपीचे वडील आणि मयत राकेश वर्मा चांगले मित्र होते. वर्मा हे आराेपीच्या वडिलांकडे त्यांचा मुलगा नशा करून भाडोत्रीला त्रास देत असल्याबाबत सांगत असल्याच्या संशयातून ही मारहाण करण्यात आली. याच मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, अन्य दोन आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय भिसे यांनी दिली.

......................................