'या' खासदाराला कोणत्याही शासकीय सोहळ्यास बोलावू नका - शिवसेनेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 08:21 AM2019-09-19T08:21:39+5:302019-09-19T08:27:26+5:30
पक्षाचे खासदार जलील हे मराठवाडा मुक्तिदिन सोहळ्यावर बहिष्कार टाकतात हे ओवेसी यांना मान्य आहे काय? ‘एमआयएम’ हा निजामाचा वंश असेल तर त्यांनी तसे स्पष्ट करावे;
मुंबई - इम्तियाज जलील यांनी निजामाची चाटुगिरी थांबवली नाही तर त्यांचाही ‘औरंग्या’ झाल्याशिवाय राहणार नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मा स्मारकासमोर संभाजीनगरची जनताच तुम्हाला गुडघे टेकायला लावेल. आता शासनाने एक करावे, स्वातंत्र्य सेनानींचा हा असा अपमान करणाऱया खासदारास कोणत्याही शासकीय सोहळ्यास बोलावू नये. देवेंद्रजी, काढा हा फतवा! महाराष्ट्रभूमीत अशा जलीलगिरीस थारा मिळता कामा नये! अशा शब्दात शिवसेनेने खासदार इम्तियाज जलील यांच्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमाला दांडी लावल्यामुळे इम्तियाज जलील यांच्यावर टीकास्त्र सोडलं जात आहे. सामना अग्रलेखातून शिवसेनेने याचा समाचार घेतला आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे पुनः पुन्हा तोच गुन्हा करीत आहेत. ज्यास कायद्याच्या भाषेत ‘देशद्रोह’ म्हटले जाते. स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्य सेनानी याबाबत जलील यांच्या मनात द्वेष असावा अशा प्रकारचे वर्तन हे महाशय जाणूनबुजून करीत आहेत असा आरोप शिवसेनेने केला आहे.
सामना अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे
- खासदार जलील यांनी सलग पाचव्यांदा ध्वजारोहण सोहळ्यावर बहिष्कार टाकून स्वातंत्र्य सेनानींचा अपमान केला व निजाम तसेच त्याच्या जुलमी रझाकारी फौजांना सलाम केला.
- एरव्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील शासकीय सोहळय़ांचे आमंत्रण मिळाले नाही किंवा त्यांच्या मगदुराप्रमाणे बसण्याची ‘आम’ किंवा ‘खास’ व्यवस्था झाली नाही की, हे आम व खास लोक थैमान घालतात.
- मागे संभाजीनगर महापालिकेच्या एका सोहळ्यात खासदार जलील यांना आमंत्रण नव्हते. त्याचा केवढा मोठा बाऊ या महाशयांनी केला होता, पण गेली पाचेक वर्षे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ध्वजारोहण सोहळ्याचे खास आमंत्रण असतानाही जलील तेथे हजर राहत नाहीत हा प्रकार संतापजनक आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संभाजीनगरातील सिद्धार्थ उद्यानात ध्वजारोहण आणि हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहण्यात आले. या सोहळ्यास लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांची उपस्थिती अपेक्षित होती, पण खासदार जलील तेथे फिरकले नाहीत. मात्र मुख्यमंत्र्यांनी खासदार जलील यांना याबद्दल जाब विचारल्याचे आमच्या कुठे वाचनात आलेले नाही.
- मराठवाड्यात 17 सप्टेंबर हा दिवस रझाकारांपासून मुक्तीचा मानला जातो. जलील हे ‘एमआयएम’ या पक्षाचे खासदार आहेत. या पक्षाची पाळेमुळे हैदराबादेत आहेत. निजामाची राजधानी हैदराबादेतच होती. इतिहासातील ‘एमआयएम’ हा पक्ष रझाकारी, अत्याचारी फौजांच्या बाजूचा होता.
- स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल यांनी देशातील साडेपाचशे संस्थाने विलीन केली, पण हैदराबादच्या निजामाने मात्र हिंदुस्थानात विलीन होण्यास नकार दिला. मराठवाडा, आंध्र, आजचा तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग अशा प्रांतात त्यावेळी निजामशाही विस्तारली होती.
- निजामाच्या रझाकारी फौजा लोकांवर अत्याचार करीत होत्या. या अत्याचाराविरुद्ध मराठवाड्यातील जनता उभी राहिली. अनेकांनी या संग्रामात हौतात्म्य पत्करले.
- सरदार पटेल यांना शेवटी हैदराबादेत ‘पोलीस ऍक्शन’ घेऊन निजामास शरण आणावे लागले. हा इतिहास आहे. हिंदुस्थानला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले हे खरे, पण गोव्यात पोर्तुगीज व हैदराबादेतील निजाम स्वतंत्र हिंदुस्थान मानायला तयार नव्हते व त्यांनी स्वतःचे सवते सुभे राखण्यासाठी हिंदुस्थानविरुद्धच लढे उभारले.
- पक्षाचे खासदार जलील हे मराठवाडा मुक्तिदिन सोहळ्यावर बहिष्कार टाकतात हे ओवेसी यांना मान्य आहे काय? ‘एमआयएम’ हा निजामाचा वंश असेल तर त्यांनी तसे स्पष्ट करावे; कारण बनावट देशभक्तीचे त्यांचे ढोंग संभाजीनगरात उघडे पडले आहे.
- त्यांना मराठवाडा स्वतंत्र झालेला नको. निजाम गेला हे वाईट झाले असे वाटते. म्हणजे ब्रिटिश गेले हे बरे झाले नाही असे वाटण्यासारखेच आहे. संभाजीनगरातील मतदारांनी गळ्यात ही कोणती धोंड बांधून घेतली आहे? याचा पश्चाताप त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही.