Join us

"आत्महत्येची बातमी उत्सवाप्रमाणे साजरी करू नका"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 3:00 AM

मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला; कोरोना काळात समाजाचे मानसिक स्वास्थ्य धोक्यात येण्याची भीती

- गौरी टेंबकर - कलगुटकर मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येच्या बातम्यांनी वृत्तवाहिन्या, सोशल मीडियाला व्यापून टाकले आहे. देशात कोरोनासारखे संकट असताना अशा नकारात्मक बातमीचे एखाद्या उत्सवाप्रमाणे केले जाणारे सादरीकरण समाजाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी घातकठरू शकते, अशी भीती मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केली.लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. उद्योगधंदे बुडाले आहेत. घरखर्च, मुलांचे शिक्षण, भविष्याची चिंता सतावत आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी असल्याने विरंगुळ्यासाठी टीव्ही, सोशल मीडियाचा वापर लोक तासन्तास करत आहेत. रविवारी सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या फ्लॅटमधील मृतदेहाच्या फोटोपासून त्याच्या भावुक पोस्ट, त्याच्या मैत्रिणी, स्टारडम, संपत्ती, आत्महत्येमागील कारण शोधणाऱ्या थिअरी, बॉलीवुडमधील आरोप-प्रत्यारोप, त्याचे नातेवाईक, मित्रांची रडारड अशा अनेक गोष्टी सातत्याने पाहायला, ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे लोकांमधील निराशा वाढत जाऊन आत्महत्येसारखे विचार त्यांच्याही मनात बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.सुशांतकडे नाव, पैसा आणि मानसन्मान असूनही त्याने हे पाऊल उचलले, माझ्याकडे सध्या काहीच नाही, मग मी तरी का जगू, अशी भावना तणावात असलेल्या व्यक्तीच्या मनात येईल अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली. तसेच नकारात्मक गोष्टींकडे अधिकाधिक दुर्लक्ष करून सकारात्मकतेकडे वळण्याची गरज असल्याचे मत मांडले.सुशांतच्या क्षमतेतून प्रेरणा घ्यामध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला सुशांत कोणताही गॉडफादर नसताना प्रचंड मेहनत आणि स्वत:च्या क्षमतेवर यशाच्या शिखरावर पोहोचला. त्याने शून्यातून जग उभे कसे केले याची प्रेरणा आजच्या कोरोना काळात प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. कटेपणा वाटल्यास मित्र, परिवाराशी बोलून भावनांना वाट करून द्यायला शिकणे आवश्यक असून आमची हेल्पलाईन हितगुज ०२२४१२१२१२ यावर याबाबत समुपदेशनही मिळवता येईल.- डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचार तज्ज्ञ, केईएम रुग्णालयकोणताही बॅकग्राऊंड नसलेल्या सुशांतला बॉलिवूडमधून वाळीत टाकण्याचा प्रयत्न ज्यांनी केला आज तेच त्याच्या पश्चात त्याची स्तुती करत आहेत, अश्रु गाळत आहेत असे चित्र विविध माध्यमांमार्फत दाखवले जात आहे. त्यामुळे मेल्यावरच माझी किंमत बॉसला, घरच्यांना किंवा मित्रांना कळेल, अशी मानसिकता बळावून आत्महत्येस प्रवृत्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘एक दुजे के लिये’ चित्रपटात प्रेमी जीवांनी केलेली आत्महत्या पाहून त्यावेळी अनेकांनी आत्महत्या केल्याची प्रकरणे घडली होती. ज्याला आम्ही ‘कॉपी कॅट सिंड्रोम’ म्हणतो. सध्या आत्महत्येच्या घटनेची वारंवार उजळणी अशाच प्रकारे लोकांच्या मनावर परिणाम करू शकते. त्यामुळे त्याला टाळणे अत्यंत गरजेचे आहे.- डॉ. युसूफ माचीसवाला, मानसोपचारतज्ज्ञ

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत