देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याबाहेर गर्दी करु नका; भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रसाद लाड यांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 12:18 PM2022-03-13T12:18:01+5:302022-03-13T12:18:32+5:30
सागर बंगल्याबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली असून ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला आहे.
मुंबई- फोन टॅपिंगप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बीकेसी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या नोटिशीची होळी करण्याचा इशारा भाजपाने दिला आहे.
बीकेसी पोलीस ठाण्याबाहेरही भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करण्याची शक्यता असल्याने बीकेसी पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच पोलीस हे फडणवीस यांच्या सागर बंगल्यात जाऊन त्यांची चौकशी करणार असल्याने सागर बंगल्याबाहेरही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सागर बंगल्याबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली असून ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला आहे. राज्यातही अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीसांना आलेल्या नोटिशीची होळी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र पोलीसच देवेंद्र फडणवीसांच्या घरी घेणार असल्याने कुणीही सागर बंगल्याबाहेर गर्दी करू नये, असं आवाहन भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे.
दरम्यान, फोन टॅपिंगप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्यांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, या मागणीसह शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर शुक्रवारी तातडीची सुनावणी पार पडली.
यापूर्वी फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्थानकांतही गुन्हा दाखल करण्यात आला होता. रश्मी शुक्ला यांना नुकताच मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून २५ मार्चपर्यंत त्यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. याच प्रकरणात आता फडणवीसांना देखील चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.
षड् यंत्राचा पर्दाफाश केल्याने नोटीस पाठविली असावी-
मी विधानसभेचा विरोधी पक्षनेता आहे आणि पोलीस माझ्याकडील माहितीचा स्रोत विचारू शकत नाहीत. मी चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे. योग्य उत्तर देणार आहे. मी सरकारच्या आशीर्वादाने विरोधी पक्षातील नेत्यांविरुद्ध झालेल्या षड्यंत्राचा अलिकडे पर्दाफाश केल्याने ही नोटीस पाठविली असावी. फोन टॅपिंग प्रकरणी मी माहिती फोडली नव्हती, सध्याच्या एका मंत्र्यांनीच ती फोडली होती आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.