धोकादायक पुलांवरून नाचगाणी नकोतच ! पालिकेचे भाविकांना आवाहन

By सीमा महांगडे | Published: August 29, 2023 07:09 PM2023-08-29T19:09:38+5:302023-08-29T19:09:59+5:30

अधिकाऱ्यांनाही एका आठवड्यात खड्ड्यांवर कार्यवाहीच्या सूचना

Don't dance on dangerous bridges! Municipality's appeal to devotees | धोकादायक पुलांवरून नाचगाणी नकोतच ! पालिकेचे भाविकांना आवाहन

धोकादायक पुलांवरून नाचगाणी नकोतच ! पालिकेचे भाविकांना आवाहन

googlenewsNext

मुंबई: मुंबईच्या रेल्वे मार्गावरील काही पूल धोकादायक स्वरुपाचे असून काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. शिवाय, काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरु करण्यात येत असल्यामुळे गणेशभक्तांनी गणेशाचे आगमन-विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी याबाबत पालिका व मुंबई पोलसानी सूचना केल्या आहेत. विशेषतः करी रोड पूल, आर्थर रोड, चिंचपोकळी रेल्वेस्थानकावरील पूल आणि भायखळा येथील ‘मंडलिक पूल’ या पुलांवर एकावेळेस १६ टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही याची काळजी घ्यावी . शिवाय या पुलांवर ध्वनीक्षेपकाचा वापर करुन नाचगाणी करू नये, पुलावर एका वेळेस भाविकांची जास्त गर्दी न करता, पुलावर जास्त वेळ न थांबता त्वरित पुलावरुन पुढे जावे असे आवाहन पालिकेकडून भाविकांना आणि मंडळांना केले आहे. 

यंदा १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीदरम्यान गणेशोत्सव साजरा होणार असून हा उत्सव सुरळीत पार पडण्यासाठी आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मध्यवर्ती यंत्रणांसह परिमंडळीय सहआयुक्त, उप आयुक्त, २४ विभागांचे सहायक आयुक्त तसेच संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत. यासाठी आगमन आणि विसर्जन मार्गांचा आढावा घ्यावा. त्या मार्गावर खड्डे आढळून आल्यास एका आठवड्याच्या आत खड्डे बुजविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या आहेत.पावसामुळे उदभवलेले खड्डे बुजवण्याची कार्यवाही वेगाने पालिकेकडून पूर्ण करण्यात येत असली तरी, गणेशोत्सवाच्या कालावधीत कोणत्याही रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होणार नसल्याची निश्चिती करण्याच्या सूचना चहल यांनी केल्या आहेत. 

अधिकारी मोहीम हाती घेणार 

पुढच्या एका आठवड्यात २४ विभागातील खड्डे बुविण्याची कार्यवाही निश्चित करण्यासाठी परिमंडळ उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागीय कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता, रस्ते विभागाचे मुख्य अभियंता,सुविधा विभागाचे उपायुक्त यांनी विविध मार्गांची पाहणी करून त्या मार्गावर खड्डे असल्यास ते बुजविण्याची मोहीम हाती घेण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. त्यानंतरच त्यांनी पुढील एका आठवड्यात ही कार्यवाही करत या मार्गांवर खड्डे राहणार नाहीत हे निश्चित करावेत से निर्देश दिले आहेत. 

खड्डेमुक्त रस्त्यांचा उद्देश साध्य करत असताना काही समस्या किंवा अडचणी उद्भवल्यास, पुढील दोन दिवसांत त्या तातडीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांना कळविणे आवश्यक असणार आहे. जेणेकरून त्यावर तातडीने उपाय योजना करता येईल असे ही आयुक्तांनी सुचविले आहे. 

धोकादायक पुलांची यादी, मध्य रेल्वे –

१) घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रिज
२) करी रोड रेल्वे ओव्हर ब्रिज
३) आर्थर रोड रेल्वे ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी रेल्वे ओव्हर ब्रिज
४) भायखळा रेल्वे ओव्हर ब्रिज

पश्चिम रेल्वे

१) मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रिज
२) सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)
३) फ्रेंच रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)
४) केनडी रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)
५) फॉकलन्ड रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये)
६) बेलासिस, मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ
७) महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हर ब्रिज
८) प्रभादेवी–कॅरोल रेल्वे ओव्हर ब्रिज
९) दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे ओव्हर ब्रिज.

Web Title: Don't dance on dangerous bridges! Municipality's appeal to devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.