लाॅकडाऊन नकोच, राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचाही विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:07 AM2021-04-02T04:07:14+5:302021-04-02T04:07:14+5:30
मुंबई : राष्ट्रवादीपाठोपाठ आता काँग्रेस पक्षानेही लाॅकडाऊनच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मागच्या वर्षीच्या लाॅकडाऊनच्या दुष्परिणामांतून सामान्य नागरिक अद्याप बाहेर ...
मुंबई : राष्ट्रवादीपाठोपाठ आता काँग्रेस पक्षानेही लाॅकडाऊनच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मागच्या वर्षीच्या लाॅकडाऊनच्या दुष्परिणामांतून सामान्य नागरिक अद्याप बाहेर पडू शकला नाही. आयुष्यभर जे मिळविले तेच वापरून संसाराचा गाडा हाकला जात आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा लाॅकडाऊन लागू केल्यास सर्वसामान्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन होताच कामा नये, अशीच आमची भूमिका असल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाई जगताप म्हणाले की, लॉकडाऊनच्या बाबतीत वेगवेगळे सूर व प्रवाह ऐकायला मिळत आहेत. लाॅकडाऊन होताच कामा नये, असे काँग्रेसचे स्पष्ट मत आहे. कामगार, व्यापारी, छोटे व मोठे उद्योजक, सर्वसामान्य नागरिक सर्वांनाच कठीण प्रसंगातून जावे लागले होते. त्यामुळे लॉकडाऊनऐवजी अधिक कडक प्रतिबंधात्मक उपाय व नियम लागू करावेत, अशीच आमची भूमिका असून राज्य सरकारलाही ही भूमिका पटल्याचे दिसत आहे, असे जगताप म्हणाले.
राज्यात सध्या रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत संचारबंदी लागू आहे. या कालावधीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक शिक्षण संस्थांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा पालकांनी परीक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेण्याची परवानगी मिळावी अशी मागणी होत आहे. या संदर्भात राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून विनंती केल्याचे जगताप यांनी सांगितले. यावेळी जगताप यांच्यासह कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, खजिनदार भूषण पाटील, सरचिटणीस संदेश कोंडविलकर उपस्थित होते.
* बैठका पुढे ढकलल्या
काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई काँग्रेसची नवनियुक्त कार्यकारिणी, पदाधिकारी आणि छाननी व रणनीती समितीची शुक्रवार, शनिवारी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेत या दोन्ही बैठका पुढे ढकलण्यात आल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.