दीदींच्या स्मारकावरुन राजकारण करु नका; हृदयनाथ मंगेशकरांनी केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 06:55 AM2022-02-11T06:55:03+5:302022-02-11T06:56:18+5:30
दीदींच्या नावे संगीत विद्यालय होत आहे. यापेक्षा मोठे अन्य कोणतेही स्मारक नाही. श्रद्धेला श्रद्धांजली वाहण्याची गरज नसते, असेही हृदयनाथ मंगेशकर यांनी स्पष्ट केले.
मुंबई : लतादीदींच्या जाण्याने आकाशाएवढी नाही तर अवकाशाएवढी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्या अवकाशाच्या पोकळीत अनेक गंगा जरी ओतल्या तरी ती पोकळी न भरून निघणारी आहे. लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा वाद सुरू आहे. मात्र मंगेशकर कुटुंबीयांना त्या वादात भाग घेण्याची अजिबात इच्छा नाही. तसेच शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांचे स्मारक व्हावे, अशीही इच्छा नाही. स्मारकावरून सुरू असणारा वाद आता राजकारण्यांनी थांबवावा, असे आवाहन पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी गुरुवारी केले.
रविवार, ६ फेब्रुवारी रोजी लता मंगेशकर यांचे निधन झाले. दुसऱ्या दिवसापासूनच लता मंगेशकर यांचे शिवाजी पार्कात स्मारक व्हावे, अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी लावून धरली. याच पार्श्वभूमीवर हृदयनाथ मंगेशकर यांनी भावना व्यक्त केल्या. राज्य सरकारने लता मंगेशकर यांना संगीत विद्यालय सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. दीदींनी स्वतः ही मागणी केली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री उदय सामंत व आदित्य ठाकरे यांनी ती मान्य करून त्याची पूर्वतयारीही केली आहे.
शिवाजी पार्कवर स्मारकाची इच्छा नाही -
दीदींच्या नावे संगीत विद्यालय होत आहे. यापेक्षा मोठे अन्य कोणतेही स्मारक नाही. श्रद्धेला श्रद्धांजली वाहण्याची गरज नसते, असेही हृदयनाथ मंगेशकर यांनी स्पष्ट केले.