गृहमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश; अफवा पसरणार नाहीत, याची खबरदारी घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करताना मुख्य उद्देश संसर्ग साखळी तोडणे हा आहे. त्यामुळे कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती होऊ नये, याची पोलिसांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पाेलीस अधिकाऱ्यांना दिले.
लॉकडाऊनच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत गृहमंत्र्यांनी राज्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आगामी सण, उत्सवाच्या काळात समाजमाध्यमांवर अधिक करडी नजर ठेवावी. आक्षेपार्ह पोस्ट, अफवा पसरणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीला गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी उपस्थित होते.
गृहमंत्री म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस विभाग सातत्याने कार्यरत आहे. कडक निर्बंध लावण्यामागचा मुख्य उद्देश हा कोविडची संसर्ग साखळी तोडणे हा आहे, हे लक्षात ठेवावे आणि कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती करू नये. नियमांची अंमलबजावणी करताना स्पष्टता ठेवा.
पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी तसेच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. पोलीस कर्तव्य बजावत असताना त्यांना जनमानसात फिरावे लागते, यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे हे लक्षात घेऊन आरोग्याबाबतही दक्षता घ्यावी. पोलीस दलातील प्रत्येकाचे तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे लसीकरण करून घ्यावे. त्यासाठी आवश्यक त्या सोयी सवलती उपलब्ध करून द्याव्यात. आगामी काळातील सण, उत्सव शांततेत, सुव्यवस्थेत पार पडावेत यासाठी विविध घटकांशी सुसंवाद वाढवावा. सुरक्षेच्या उपायांबाबत विश्वास निर्माण करत नागरिकांशी समन्वयाचे नाते असावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
.................................