'आता मंत्रिमंडळ विस्तार करू नका...'; बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 11:46 AM2023-08-06T11:46:33+5:302023-08-06T11:48:56+5:30
राज्यातील बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार हा १५ ऑगस्टपुर्वीच होण्याची शक्यता आहे.
मुंबई: राज्यातील बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार हा १५ ऑगस्टपुर्वीच होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात नुकतीच यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र माजी मंत्री आणि शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन देणारे आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने मंत्रिपदाचा दावा आमदार बच्चू कडू यांनी सोडला आहे. तर विस्तार केव्हा होईल हा प्रश्न बच्चू कडू यांना विचारला असता त्यांनी उत्तर दिलं. मंत्रिमंडळ विस्ताराच्यादिवशी मी इथं राहणार नाही. मी अमेरिकेला जाईन. आता मंत्रिमंडळ विस्तार करू नका, जसं आहे तसचं राहू द्या. विनाकारण चार लोकांना दुःखी कराल. याला घेतलं नाही, त्याला घेतलं नाही तर सरकार चांगल्यापद्धतीने चालत आहे व जे मंत्री आता आहे ते सक्षम आहेत अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी दुपारच्या सरकारी कार्यक्रमासाठी शनिवारी रात्रीच पुण्यात दाखल झाले. रविवारचा कार्यक्रम पिंपरीत दुपारी १२ वाजता आहे. त्यानंतरही ते सायंकाळपर्यंत पुण्यात थांबणार आहेत. पक्षाचा कोणताही कार्यक्रम नाही, तरीही शनिवारची संपूर्ण रात्र व रविवारच्या कार्यक्रमाचा वेळ वगळता, शाह यांचा सगळा वेळ राखीव आहे. या राखीव वेळेचे रहस्य काय, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नातेवाइकांची भेट
शाह यांच्या मावशी पुण्यात मार्केट यार्डमध्ये राहतात. सायंकाळी ते मार्केट यार्डमध्ये मावशीच्या घरी गेले. त्यांची भेट घेऊन परत मुक्कामाच्या ठिकाणी आले. त्यानंतरचा सगळा वेळ त्यांनी राखीव ठेवला. रात्री उशिरा त्यांची एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासमवेत बैठक होईल, अशी माहिती मिळाली.