तंत्रशिक्षण संचालनालय विद्यार्थी पालकांना प्रवेशाआधी सतर्कतेचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रवेश नियामक प्राधिकरण, सीईटी सेल कक्ष आणि इतर प्राधिकरणामार्फत लवकरच राज्यात विविध अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया राज्यात राबविण्यात येणार आहेत. या अभ्यासक्रमांना अधिकृत आणि सक्षम प्राधिकरणाची मान्यता आवश्यक आहे. या प्राधिकरणाची मान्यता असलेल्या राज्यातील शैक्षणिक संस्था व तेथे चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाची यादी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तेव्हा विद्यार्थी पालकांनी अनधिकृत संस्थांच्या जाळ्यात न फसता, प्रवेश घेऊ नये, असे आवाहन तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले आहे.
बारावीच्या परीक्षाचा निर्णय झाल्यानंतर लगेचच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी पदवी व पदव्युत्तर प्रवेश परीक्षा आणि त्यापुढील प्रवेश प्रक्रिया अधिकृत प्राधिकरणाकडून जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांनी कोणत्याही अनधिकृत संस्थांच्या भूलथापांना बळी न पडता अभ्यासक्रमाची मान्यता तपासून घ्यावी, तसेच संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या यादीत संबंधित संस्थेचे नाव व अभ्यासक्रम आहे का, याची खात्री करावी आणि मगच प्रवेश घ्यावा, असे संचालक अभय वाघ यांनी सूचित केले आहे. याआधीही संचालनालयाकडून आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्राची यादी जाहीर करून ती तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते.