सायबर पोलिसांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ख्रिसमस निमित्ताने सांताक्लॉज तुम्हाला गिफ्ट पाठवत आहे, असे सांगून फसवणूक केल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले.
मुंबई सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर ओळख झालेल्या अनोळखी व्यक्तीकडून परदेशातून ख्रिसमस गिफ्ट पाठविल्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात येत आहे. यात गिफ्ट दिल्ली विमानतळावर कस्टमने अडविले आहे, असे सांंगून तसेच पुढे वेगवेगळी कारणे देऊन लाखोंची फसवणूक होत आहे.
सांताक्लॉज तुम्हाला गिफ्ट पाठवत आहे, अशा प्रकारच्या कॉल संदेशांकडेही दुर्लक्ष करावे. कारण त्यांनी पाठविलेली लिंक उघडताच तुमची माहिती चोरी होऊ शकते. तसेच कोरोनाच्या लसीबाबत येणाऱ्या कॉल संदेशाबाबतही सतर्क राहून, शासनाच्या अधिकृत लसीलाच प्राधान्य द्या. कोणी फसवणूक करीत असल्याचे लक्षात येताच जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा, असे आवाहन करंदीकर यांनी केले.
.................................