मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर अद्यापही कोरोनातून बरे झालेले नाही. रुग्णांची संख्या कमी होत असली तरी देखील नियमांचे उल्लंघन झाल्यास कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. आणि आता त्यात दिवाळी तोंडावर आली आहे. परिणामी या दिवाळीत फटाके फोडू नका. कारण फडाके फोडले आणि त्याचा धूर मोठया प्रमाणावर वातावरणात मिसळला तर त्याचा त्रास कोरोना रुग्णांनासह नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना मोठया प्रमाणावर होऊ शकतो. त्यामुळे यावर्षी कोरोनाला हरविण्यासाठी दिवाळी पर्यावरणपूरक साजरी करा, असे आवाहन पर्यावरण क्षेत्रात काम करत असलेल्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
दरवर्षी दिवाळी मोठया धूमधडक्यात साजरी केली जाते. आतिषबाजीने अवकाश उजळून निघते. मात्र या काळात मोठया प्रमाणावर फटाके फोडल्याने ध्वनी आणि वायू प्रदूषण होते. विशेषत: दिवाळीच्या शेवटच्या दिवसांत झालेल्या प्रदूषणाची जाणीव मुंबईकरांना होते. कारण त्या रात्री संपुर्ण मुंबईवर फटाक्यांच्या धूरांचे थर जमा झालेले असतात. परिणामी दरवर्षी पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन मुंबईकरांना पर्यावरणवाद्यांकडून केले जात आहे. यावर्षी तर अवघ्या जगावर कोरोनाचे सावट आहे. भारतात, महाराष्ट्रात आणि मुंबईत अद्यापही कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली आही. मात्र कोरोनाला आळा घालण्याबाबत प्रशासनाकडून उल्लेखनीय पाऊले उचलली जात आहेत. असे असले तरी कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना फटाक्यांच्या धूराचा मोठया प्रमाणावर त्रास होऊ शकतो. कारण कोरोना रुग्णांची रोग प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. अशावेळी त्यांना फटाक्यांतून निघणा-या विषारी धूराचा त्रास येऊन जीव धोक्यात येऊ शकतो. परिणामी फटाके फोडण्यात येऊ नयेत. ध्वनी आणि वायू प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. कोरोना रुग्णांना नव्हे तर प्रत्येकाला ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात यावे; यासाठी काम सुरु केल्याचे मुंबईतल्या पर्यावरणवादी मिली शेटटी यांनी सांगितले. समाज माध्यमांचादेखील यासाठी वापर करण्यात येत असून, अधिकाधिक नागरिकांपर्यंत हा संदेश पोहचविला जात आहे, असेही शेटटी यांनी सांगितले.