दिवाळीत फटाके फोडू नका; धुराचा त्रास बाधितांना होईल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 03:41 AM2020-11-01T03:41:18+5:302020-11-01T03:41:49+5:30
fire crackers : दिवाळीत फटाके फोडू नका. फटाके फोडले. त्याचा धूर मोठ्या प्रमाणावर वातावरणात मिसळला तर त्याचा त्रास कोरोना रुग्णांसह नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर अद्यापही कोरोनातून बरे झालेले नाही. रुग्णांची संख्या कमी होत असली तरीदेखील नियमांचे उल्लंघन झाल्यास कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यात दिवाळी तोंडावर आली आहे.
दिवाळीत फटाके फोडू नका. फटाके फोडले. त्याचा धूर मोठ्या प्रमाणावर वातावरणात मिसळला तर त्याचा त्रास कोरोना रुग्णांसह नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. या वर्षी कोरोनाला हरविण्यासाठी दिवाळी पर्यावरणपूरक साजरी करा, असे आवाहन पर्यावरण क्षेत्रात काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
या वर्षी तर अवघ्या जगावर कोरोनाचे सावट आहे. भारतात, महाराष्ट्रात आणि मुंबईत अद्यापही कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. कोरोनाला आळा घालण्याबाबत प्रशासनाकडून उल्लेखनीय पावले उचलली जात आहेत. असे असले तरी कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना फटाक्यांच्या धुराचा मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो.
कारण कोरोना रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. अशावेळी त्यांना फटाक्यांतून निघणाऱ्या विषारी धुराचा त्रास होऊन जीव धोक्यात येऊ शकतो. फटाके फोडू नयेत. ध्वनी आणि वायुप्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
कोरोना रुग्णांनाच नव्हेतर, कोणालाच ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात यावी; यासाठी काम सुरू केल्याचे मुंबईतल्या पर्यावरणवादी मिली शेट्टी यांनी सांगितले. समाजमाध्यमांचादेखील यासाठी वापर करण्यात येत असून, अधिकाधिक नागरिकांपर्यंत हा संदेश पोहोचविला जात आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले.