दिवाळीत फटाके फोडू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जनतेला आवाहन
By बाळकृष्ण परब | Published: November 8, 2020 02:01 PM2020-11-08T14:01:32+5:302020-11-08T14:08:06+5:30
Uddhav Thackeray News : प्रदूषणामुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या दिवाळीत शक्यतो फटाके वाजवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.
मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला संबोधित करताना आज दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. राज्यातील कोरोनाचा आकडा आता नियंत्रणात आला आहे. मात्र धोका टळलेला नाही. प्रदूषणामुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या दिवाळीत शक्यतो फटाके वाजवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.
आज राज्यातील जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत आपण गणपती, नवरात्र असे सण साजरे केले. खरंतर हे सण साजरे केले की पार पाडले हा प्रश्नच आहे. अनलॉक होत असल्याने गर्दी वाढत आहे. गर्दी ही जिवंतपणाचं लक्षण आहे. मात्र अद्याप धोका टळलेला नाही. दिल्लीत कोरोनाचा आकडा वाढतो आहे. पाश्चिमात्य देशातही कोरोना वाढत आहे. दिल्लीत प्रदूषणामुळे कोरोना वाढल्याचे सांगण्यात येत आहे. प्रदूषणामुळे श्वसनसंस्थेवर परिणाम होतो. त्यातून कोरोनाचा धोका वाढतो.
People should avoid bursting firecrackers as pollution can affect COVID-19 patients: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray
— Press Trust of India (@PTI_News) November 8, 2020
त्यामुळे दिवाळीत फटाके फोडण्याबाबत काय निर्णय़ घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र मी बंदी वगैरे घालणार नाही. मात्र शक्यतो दिवाळीत फटाके फोडू नका. प्रदूषण करणारे फटाके वाजवू नका. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका. मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणात येतोय. त्यामुळे गेल्या काही दिवसांत जे कमावलंय ते चार दिवसांच्या धुरात वाहून जाऊ देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.