देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना माती आणि मातेला विसरू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 01:57 AM2020-08-29T01:57:45+5:302020-08-29T01:57:58+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : नागरी सेवा परीक्षेतील गुणवंतांचा विधान भवनात गौरव
मुंबई : प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झालेले महाराष्ट्राचे वैभव आणि उद्याचे भाग्यविधाते उमेदवार भविष्यातील जबाबदारीची परीक्षादेखील जिद्दीने पार पाडतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना माती आणि मातेला मात्र विसरू नका, असा सल्लाही त्यांनी प्रशासकीय सेवेत रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना दिला. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत २०१९ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील ७९ उमेदवारांचा गौरव समारंभ महाराष्ट्र विधान मंडळामार्फत विधान भवन येथे मंगळवारी आयोजित करण्यात आला. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, आता पंख फुटले आहेत, मोठी भरारी घ्यायची आहे. त्यामुळे कोणतीही जबाबदारी पार पाडताना सकारात्मक बदल घडून माझे राज्य, देश सर्वोत्तम झाले पाहिजे ही जिद्द बाळगा. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री अॅड. अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे, विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आदी या वेळी उपस्थित होते. नाईक निंबाळकर म्हणाले, सरकार कुणाचेही असले तरीही प्रशासकीय अधिकारी हा महत्त्वाचा घटक असल्याने कायदा योग्य रीतीने वापरून सर्वसामान्यांची कामे सकारात्मकतेने करा़ पटोले म्हणाले, विधिमंडळामार्फत सत्काराचा हा कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे़ हा सत्कार राज्याच्या वतीने असल्याने पुढील पिढीसाठीही मार्गदर्शक ठरेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विधिमंडळाच्या इमारतीत हा सत्कार होत असल्याने याला विशेष महत्त्व आहे़ आपण कोणतीही जबाबदारी पार पाडताना सर्वसामान्यांना न्याय देऊन त्यांच्या चेहºयावर आनंद निर्माण करा़
थोरात म्हणाले, राज्य किंवा देश पुढे नेण्यात अधिकाºयांची मोठी जबाबदारी आहे़ फडणवीस म्हणाले, प्रशासकीय अधिकारी हा लोकाभिमुख काम करण्यासाठी आणि सरकारची प्रतिमा ठरवणारा महत्त्वाचा घटक आहे. आपल्या अधिकारांचा सकारात्मक उपयोग करून समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करायची आहे, हे विसरू नका.
या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नेहा भोसले, मंदार पत्की, आशुतोष कुलकर्णी, दीपक करवा, विशाल नरवाडे, राहुल लक्ष्मण चव्हाण, नेहा दिवाकर देसाई, अभयसिंह देशमुख, यशप्रताप श्रीमल, अश्विनी वाकडे, सुमित महाजन, योगेश कापसे, गौरी नितीन पुजारी, शंतनू अत्रे, अनिकेत सचान, अजहरुद्दिन काजी जहिरुद्दिन काजी, निमिश पाटील, महेश गीते, अमितकुमार महातो, प्रणोती संकपाळ, सुमित जगताप, प्रसन्ना लोध, अंकिता वाकेकर, स्वप्निल जगन्नाथ पवार, अभिषेक दुधाळ, डॉ. प्रदीप डुबल, करुण गरड, हृषीकेश देशमुख, निखिल कांबळे, संग्राम शिंदे, सत्यजित यादव, सुनील शिंदे या उपस्थित यशस्वी उमेदवारांचा गौरवचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी सर्वांचे आभार मानले.