बूस्टरचा विसर नको, कोरोना वाढतोय; लसीकरण पूर्ण करा
By स्नेहा मोरे | Published: March 25, 2023 07:12 PM2023-03-25T19:12:33+5:302023-03-25T19:13:04+5:30
बूस्टर डोस वा लसीकरण पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे असा सल्ला राज्याच्या कोरोना टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिला आहे.
मुंबई – कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे संसर्ग वाढत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी मांडले आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा राज्याच्या आरोग्य विभागाकडून आणि पालिका प्रशासनाकडून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. आजही राज्यासह मुंबईतील अनेक नागरिकांनी बूस्टरची मात्रा घेतली नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे प्रतिपिंड कमी झाल्याने वाढणारा कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी बूस्टर डोस वा लसीकरण पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे असा सल्ला राज्याच्या कोरोना टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिला आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जनुकीय क्रमनिर्धारण चाचणीत राज्यातील १०५ नमुने XBB 1.16 व्हेरिएंटचे आढळले आहेत. कोरोना विषाणूमध्ये सातत्याने बदल होत असून त्याचे उपपक्रार समोर येत आहेत. परिणामी, एन्डेमिक स्थितीत असलेल्या साथीमध्ये होणारे हे बदल सामान्य आहेत. मात्र त्याची तीव्रता कमी करण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी यंत्रणानी तयार राहिले पाहिजे. शिवाय, सामान्यांनीही संसर्ग वाढला की घाबरुन जाण्यापेक्षा लसीकरण पूर्ण केले पाहिजे. मुंबईत अजूनही बूस्टर डोस घेण्याबाबत उदासीनता दिसत आहेत, ही मात्रा घ्यायला हवी. यामुळे कोरोना संसर्गाची तीव्रता गंभीर होण्याची शक्यता कमी होते, अशी माहिती राज्याच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या वाढणाऱ्या संसर्गाला तुर्तास तरी घाबरण्याची परिस्थिती नसली तरी कोरोनाचा बूस्टर डोस घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तसेच ज्यांनी कोरोना लसीचा एकही किंवा एकच डोस घेतलेल्यांनी लसीकरण पूर्ण करून घ्यावे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गरोदर, स्तनदा मातांना आणि दिव्यांगांना रांगेत न थांबता लस दिली जात आहे.
कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, राज्यात १६ ते २४ मार्चदरम्यान २ हजार २११ करोना रुग्ण आढळले आहेत. ही वाढ मार्चच्या दुसऱ्या आठवड्याच्या तुलनेत तिपटीपेक्षा अधिक आहे. या काळात दररोज २०० पेक्षा अधिक रुग्ण नोंद आहे. २२ व २४ मार्च रोजी करोना रुग्णांच्या संख्येने तीनशेचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन १७६३ झाली आहे.
मुंबईतील एकूण लसीकरण आकडेवारी
पहिली मात्रा १०८९३३२५
दुसरी मात्रा ९८१४६२८
वर्धक/बूस्टर मात्रा १४८७१८४
मुंबईतील बूस्टर मात्रा लसीकरण स्थिती
आरोग्य/फ्रंटलाईन कर्मचारी २४४८१८
६० वर्षांहून अधिक ४८६५५९
४५ ते ५९ २९०७०५
१८ ते ४४ ४६०८९९