लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काँग्रेस नेतृत्वाविरोधातील वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असे सांगतानाच काँग्रेस प्रदेश प्रभारी एच.के. पाटील यांनी मंगळवारी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाबाबत विधाने करणारे त्याचा घटकही नाहीत किंवा सहानुभूतीदारही. इतक्या महत्त्वाच्या राजकीय आघाडीच्या कारभारात नाक खुपसणे शहाणपणाचे नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
एच.के. पाटील यांच्या उपस्थितीत आज मुंबईच्या नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक झाली. या वेळी मुंबई अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, नसीम खान, अमरजीत मनहास यांच्या सोबतच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या वेळी आगामी पालिका निवडणुकांसदर्भातही चर्चा झाली. सोमवारी पदग्रहण सभारंभातही एच.के. पाटील यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी संजय राऊत यांच्या विधानावर आक्षेप घेतला होता. राजकीय व्यक्तीच्या विधानाला ते उत्तर होते, असे सांगतानाच थेट शिवसेनेवर भाष्य करण्याचे त्यांनी या वेळी टाळले. मुंबईत पक्षवाढीसाठी मिशन मोडवर काम केले जाणार असून शंभर दिवसांच्या कार्यक्रमात पदयात्रांच्या माध्यमातून २२७ वाॅर्डांतील कार्यकर्ते आणि तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचणार असल्याचे पाटील म्हणाले.
तर, महाविकास आघाडी राज्यात आहे. ती किमान समान कार्यक्रमावर सुरू आहे. राज्यात आम्ही सत्तेत असलो तरी मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे पालिका आणि महाविकास आघाडीचा काही संबंध नाही. त्यामुळेच सर्व २२७ जागांवर निवडणूक लढविण्याचा मनसुबा पदग्रहण करताना व्यक्त केल्याचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी स्पष्ट केले. पुढच्या शंभर दिवसांत प्रत्येक वॉर्डात जाऊ, तेथे जनता दरबार घेऊन लोकांची कामे करु. स्थानिक कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊन वरिष्ठांना २२७ जागा का लढायच्या ते सांगू, असेही जगताप म्हणाले.