डबल डेकरची आशा सोडू नका, ‘बेस्ट’ नवीन डबल डेकर घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 12:51 AM2020-01-05T00:51:46+5:302020-01-05T00:51:53+5:30
वयोमर्यादेनुसार बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील ७० डबल डेकर बसगाड्या काही महिन्यांतच भंगारात काढण्यात येणार आहेत.
मुंबई : वयोमर्यादेनुसार बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील ७० डबल डेकर बसगाड्या काही महिन्यांतच भंगारात काढण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईची ही शान हद्दपार होणार, अशी हुरहुर मुंबईकरांकडून व्यक्त होत आहे, परंतु त्याच वेळी काही नवीन डबल डेकर बसगाड्या घेण्याच्या हालचाली बेस्ट उपक्रमात सुरू आहेत. त्यामुळे मुंबईचे आकर्षण असलेल्या या बसगाड्यांमधून मरिन ड्राइव्हची सफर करण्याची संधी मिळण्याची आशा कायम आहे.
मुंबईत पहिली डबल डेकर बसगाडी १९३७ मध्ये धावली. अल्पावधीतच या बसगाडीची लोकप्रियता प्रवासी आणि पर्यटकांमध्ये वाढली. त्यामुळे १९९३ पर्यंत बेस्ट उपक्रमात तब्बल ९०१ डबल डेकर बसगाड्या दाखल झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर उड्डाणपूल वाढले आणि आर्थिक चणचणीत असलेल्या बेस्ट उपक्रमाला या बसगाड्यांच्या देखभालीचा खर्च डोईजड झाला. परिणामी, जेमतेम १२० डबल डेकर बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात शिल्लक आहेत. यापैकी १४ वर्षे पूर्ण झालेल्या ७० डबल डेकर जून, २०२० ते मार्च, २०२१ पर्यंत भंगारात काढण्यात येणार आहेत.
बेस्ट अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही डबल डेकर बसगाड्या भंगारात काढल्यानंतर ५० नवीन डबल डेकर बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. प्रवासी भाड्यात कपात केल्यानंतर बेस्ट उपक्रमाच्या प्रवाशी संख्येत वाढ झाली आहे. दररोज ३२ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे बस ताफा दहा हजारांपर्यंत वाढविण्याचा निर्धार बेस्ट प्रशासनाने केला आहे. त्यानुसार, वातानुकूलित मिनी, मिडी, इलेक्ट्रिक बसगाड्या भाडे तत्त्वावर घेण्यात येत आहेत.
>पालिकेने मदत केल्यास...
आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला महापालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. आतापर्यंत दोन हजार कोटी रुपये अनुदान व कर्ज स्वरूपात देण्यात आले आहेत. बसगाड्यांच्या खरेदीसाठीही निधी देण्याची हमी पालिका प्रशासनाने दिली आहे. डबल डेकर बस सुरू ठेवण्याची लोकांची मागणी आहे. त्यामुळे पालिकेकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून डबल डेकर घेता येतील, असे बेस्टमधील सूत्रांनी सांगितले.
>1937 मध्ये डबल डेकर बसगाड्या मुंबईच्या रस्त्यांवर पहिल्यांदा धावल्या.
1993पर्यंत बेस्टच्या ताफ्यात ९०१ डबल डेकर बसगाड्या दाखल झाल्या होत्या.
120 डबल डेकर बसगाड्या असून, यापैकी ७२ बसगाड्या जून, २०२० ते मार्च, २०२१ पर्यंत भंगारात काढण्यात येणार आहेत.
>140 आसन क्षमता या बसगाडीमध्ये असते. त्यामुळे सीएसटीएम-नरिमन पॉइंट, वांद्रे स्थानक, कुर्ला स्थानक-वांद्रे कुर्ला संकुल या ठिकाणी अशा नऊ मार्गांवर धावत आहेत. रविवारी या बसगाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गेट वे आॅफ इंडिया या बस मार्गावर धावतात.
>एका डबल डेकरचे उत्पन्न प्रति कि.मी. ६५.८६ रुपये, खर्च मात्र प्रति कि.मी. २००.४६ रुपये एवढा आहे. बेस्टअंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही डबल डेकर बसगाड्या भंगारात काढल्यानंतर ५० नवीन डबल डेकर बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
>नियमानुसार डबल डेकर बसगाड्या भंगारात काढण्यात येणार आहेत. मात्र, या बसगाड्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.
- सुरेंद्रकुमार बागडे,
महाव्यवस्थापक, बेस्ट प्रशासन.